परळी:आठवडा विशेष टीम― किडणीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी सुरुवातीला लातूर व नंतर तेथून औरंगाबादला उपचारासाठी गेलेल्या परळी शहरातील महिलेचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरील 57 वर्षीय महिला बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता आरोग्य विभागाकडून परळी शहरात संपर्क शोधण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.
किडणीच्या आजाराने त्रस्त असलेली परळीतील ही महिला 2 जून रोजी ती लातूर येथील एका रुग्णालयात गेली. तेथून तिला औरंगाबादला रेफर केले. औरंगाबादमध्ये या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. शुक्रवारी याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर औरंगाबाद आरोग्य विभागाने बीड आरोग्य विभागाला माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार व परळी तालुक्यातील आरोग्य विभाग कामाला लागला आहे. रात्री उशिरापर्यंत महिलेच्या सहवासितांचा शोध व कंटेनमेंट झोन तयार करण्याची कारवाई सूरू होती. दरम्यान बाधित महिलेला प्रवासाचा इतिहास नसल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार केली जात आहे.
काही भागात कंटेनमेंट झोन :
सदर महिला पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर परळी शहरातील जगतकर गल्ली भीमनगर मधील सुभाष मानसिंग कसबे यांचे घर ते संतोष आदोडे यांच्या घरापर्यंतच्या परिसरात कंटेनमेंट झोन लागू करण्यात आला असून हा भाग अनिश्चित कालावधीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.