नाशिक जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

नाशिक: पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करा– पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि.६:आठवडा विशेष टीम― देवसाने (मांजरपाडा) वळण योजनेतील पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास विभागाचे कार्यकारी संचालक एन.व्ही.शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी सदर प्रकल्पाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत या प्रकल्पाबाबत चर्चा केली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, देवसाने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकल्प कामांचा आढावा घेतला. मांजरपाडा हा नाशिक जिल्ह्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. यातून नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी देणे शक्य होणार आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील कालेश्वरम प्रकल्पाचा अभ्यास करून मराठवाड्याला पाणी वळविण्याबाबत अहवाल तयार करण्यात यावा अशा सूचना दिल्या. तसेच पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील १ ते २५ किलोमीटर अंतराचे विस्तारिकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने अधिक गतीने पाणी पुढे जाणार असल्याने पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी हे येवला तालुक्यात जाऊ शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोविड-१९ पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खर्चाबाबत निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र पश्चिमेकडे वाहणारे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवणारी देवसाने (मांजरपाडा) ही महत्वकांक्षी योजना असल्याने तसेच मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या योजनेतील अपूर्ण कामे लवकरत लवकर पूर्ण व्हावे यासाठी देवसाने वळण योजनेच्या दायित्व प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी श्री.भुजबळ यांनी जलसंपदा मंत्र्याकडे केली होती. त्यामुळे देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या खर्चाचे निर्बंध शिथिल करण्यात आले असून पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालव्यातील कामांना निधी वितरीत करून ही कामे पूर्ण केली जातील तसेच देवसाने वळण योजनेसाठी ४१.६३ कोटी दायित्व प्रस्ताव मंजुरीस शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती संचालक एन. व्ही.शिंदे यांनी दिली.

देवसाने (मांजरपाडा) वळण योजना हा अत्यंत विश्वासार्ह प्रकल्प – एन. व्ही. शिंदे

देवसाने (मांजरपाडा) वळण योजना प्रकल्प अत्यंत विश्वासार्ह प्रकल्प असून या प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे आहे. या प्रकल्पाला पाणी उपलब्धतेबाबत १०० टक्के शाश्वती असल्याने हा अत्यंत यशस्वी प्रकल्प असून महाराष्ट्र राज्यासमोर हा पायलट प्रोजेक्ट राहील असा विश्वास गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एन.व्ही.शिंदे यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रकल्प पाहणीनंतर घेतलेल्या भेटीत व्यक्त केला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.