सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खरिपाच्या हंगामात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची शेती पुन्हा पडीक पडू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मोफत बियाणे आणि खते पुरविण्याबाबत सोयगाव तालुक्यात शनिवारी तातडीने कारवाई केली आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांच्यासह पत्घाकांनी सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून त्यांच्या खरिपाच्या पूर्वतयारी विषयी माहिती घेतली व त्यांना मोफत बियाणे व खते पुरवठा करण्याबाबत कारवाई केली.
सोयगाव तालुक्यात तब्बल ५५ शेतकऱ्यांनी दुष्काळाला तोंड देतांना मृत्यूला कवटाळले आहे.या शेतकऱ्यांच्या वारसांना यंदाच्या खरीपात गैरसोय दूर व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पावले उचलली असून सोयगाव पंचायत समितीच्या पथकाने शनिवारी या वारसांच्या भेटी घेत त्यांना खरीपासाठी भरीव मदत मिळणार असून धीर दिला आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून या वारसांना मोफत बियाणे एक हेक्टर मर्यादा आणि रासायनिक खते मोफत देण्यात येणार असून मोफत बियाण्यांमध्ये मका आणि कपाशी या बियाण्यांचा समावेश आहे.एक हेक्टर पर्यंतची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची शेती शासन कसणार असून मोफत बियाण्यान्सोबतच यावर लागणारा खर्च आणि रासायनिक खते या योजनेतून वितरण करण्यात येणार आहे .त्यासाठी कुटुंबातील वारसाचे बँक खाते,आधार क्रमांक,आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र आदि संकलित करण्याचे काम पंचायत समितीच्या पथकांनी केले आहे.विस्तार अधिकारी केवलसिंग पाटील,विस्तार अधिकारी अजय गवळी,देविदास साळुंके,उमेश पाटील आदींच्या पथकांनी हि माहिती संकलित केली आहे.
सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेवून त्यांची परिस्थितीचा आढावा व उर्वरित कागदपत्रांचे संकलन करून तातडीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला पाठविण्यात आले आहे.येत्या आठवडाभरात या कुटुंबियांना खरिपाच्या पेरण्यासाठी मदत थेट खात्यावर जमा होईल.
―सुदर्शन तुपे
गटविकास अधिकारी