सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हुलकावणी दिली आहे,रोहिणी नक्षत्रात एक दिवस झालेल्या पावसानंतर रोहिणी नक्षत्राचे तीन दिवस कोरडेठाक गेल्याने सोयगाव तालुक्यात हंगामीपूर्व कपाशी पिकांचे कोवळे अंकुर धोक्यात आले आहे.पावसाने डोळे वटारल्याने मात्र सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरिपातही मृगाच्या पेरण्या धोक्यात आल्या आहे.
खरीप हंगाम २०१९-२० मध्ये खरिपाच्या मृगाच्या पेरण्याना मृग नक्षत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती मागील खरिपाच्या हंगामात पावसाने तब्बल २२ जून नंतर सोयगाव तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली होती.त्यामुळे सलग दुसऱ्यांदा मृगाच्या पेरण्यांना पावसाची हुलकावणी मिळण्याचे चित्र पहिल्याच दिवशी निर्माण झाले होते.यंदाच्या खरिपाच्या पूर्वतयारीसाठी सोयगाव तालुक्यात ४३ हजार हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रापैकी ३८ हजार हेक्टरवरील क्षेत्रात पूर्वतयारी झालेली आहे.मात्र पहिल्याच दिवशी मृगाच्या पावसाने शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे.
मृगाच्या पावसाला खरिपाच्या पेरण्यांमध्ये महत्व-
मृगाच्या पेरण्यांना महत्व देण्यात येत असतांना सोयगाव तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षात मृगाच्या पेरण्यांना पावसाने हुलकावणी दिली आहे.यंदाच्या वर्षातही पहिल्याच दिवशी हुलकावणी देवून आकाशाने डोळे वटारले आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
पूर्वहंगामी कपाशी पिकांचे कोवळे अंकुर होरपळले-
ठिबक सिंचनच्या पाण्यावर तग धरणाऱ्या पूर्वहंगामी कपाशी लागवड करण्यात आलेल्या कोवळ्या अंकुरांना मृगाच्या पावसाची नितांत आवश्यकता असते असे जुन्या जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे,मात्र सोयगाव तालुक्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशीच्या कोवळ्या अंकुरांना अजूनही उन्हाचे चटके बसत आहे.ऐन मृग नक्षत्रातही सोयगाव तालुक्यात रविवारी उन्हाची तीव्रता वाढलेली होती,त्यामुळे उन्हाच्या दह्कातेत पूर्वहंगामी कपाशीचे कोवळे अंकुर होरपळत होते.
सोयगाव परिसरात उन सावल्यांचा खेळ-
मृगाच्या पहिल्याच दिवशी रविवारी सोयगाव तालुक्यात उन-सावल्यांचा खेळ सुरु झाला होता,ढगाळ वातावरण आणि त्यातच चटकनारे उन यामुळे सोयगाव परिसरात उन-सावल्यांचा खेळ मोठ्या प्रमाणावर दिसून आला.मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून होते.