शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी माणसं नाहीत का?
गोंदिया दि.७:बिंबिसार शहारे―जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र आणि कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले.सोबतच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना फक्त शिक्षणेत्तर कामासाठी परवानगी देण्यात आली.अशातच माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र व्हीडीओकॉन्फरन्सचा संदर्भ देत २६ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्याने करोना संसर्ग काळात शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकाऱ्यांचा प्रश्नावरून आता खलबते सुरू झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोठा की शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश अशा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोना संसर्ग परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिले असतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवासोंबत ४ जून रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसचा संदर्भ घेत शाळा सुरू करण्यासंबंधीच्या चाचपणीसाठी ८ ते १० जून या कालावधीत गावपातळीवरील सर्व शाळा व्यवस्थापन समिती व पालकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
त्यातच प्राथमिक शिक्षण विभागाने मात्र अद्यापही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देणार अशा बातम्या प्रसारित करून प्रभारी शिक्षणाधिकारी वाहवाही लुटण्यात व्यस्त झालेले आहेत.जेव्हा गावपातळीवर सर्वाधिक क्वारंटाईन केंद्र हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राहिलेले आहेत.त्या केंद्रातून क्वारंटाईन झालेले व्यक्ती परत घरी गेल्यावर त्या शाळेचे निर्जुंतीकरण करण्यासाठी मात्र प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे कुठेच नियोजन दिसून येत नसतानाच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याने पालकांसह शिक्षकांतही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने ५ जून रोजी सर्व मुख्याध्यापकांच्या नावे पत्र काढून जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू करण्याचा सूचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ८ ते १० जून या कालावधीत शाळा व्यवस्थापन समितीची सभा तसेच परिस्थितीचा पूर्ण आढावा शैक्षणिक पद्धती कशी राहील यावर ११ जून रोजी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण समितीची सभा घेऊन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी माध्यमिक पी.एम.कचवे यांनी दिले.जेव्हा की जिल्हाधिकारी यांना दोन दिवसाआधीच पत्र काढून फक्त अशैक्षणिक कामासाठीच शाळेत जाता येईल असे म्हटले आहे.
या शैक्षणिक सत्रात शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या त्या बाबत सविस्तर सूचना शासनाकडून प्राप्त होणार आहेत. तथापि व्हिडिओ कॉन्फरंसच्या मधील सूचनांचा विचार करता शैक्षणिक सत्र सुरू करण्याआधी काही आवश्यक बाबींचा विचार होणार आहे. त्यामध्ये गावात संसर्गाचा प्रादुर्भावाची माहिती मुख्याध्यापकाने ठेवणे बंधनकारक आहे. शाळेतील वर्ग १ दिवसाआड भरवता येतील का? पटसंख्या जास्त असल्यास ऑडइवन पद्धती प्रशासनाचे निर्देशाचे सर्व पालन असे विविध निर्देशाची अंमलबजावणी करावयाची आहे. त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समिती यांची ८ ते १० जून या कालावधीत सभा बोलावून सामाजिक अंतर शाळेची पटसंख्या, शिक्षक संख्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने निर्णय होणार आहे. त्यानंतर भौतिक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता याचा परिपूर्ण विचार शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण समिती सभेमध्ये करून आपल्या शाळेचे स्वतंत्र नियोजन करून ते गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत ११ जूनपर्यंत तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी माध्यमिक पी.एम. कचवे यांनी दिले आहेत.
तर दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना फक्त शिक्षणेत्तर कामासाठी परवानगी दिली आहे.जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये या शैक्षणिक संस्थांची कार्यालये व कर्मचारी वर्ग यांना फक्त ऑनलाइन शैक्षणिक पद्धतीचा विकास करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे आणि निकाल घोषित करणे आदी. शिक्षणेत्तर कामासाठी कार्यरत राहण्याची परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे.
शिक्षणाधिकारी कचवे यांच्या पत्रानुसार त्या त्या शाळेतील सर्व मुख्याध्यापकासह शिक्षकांना करोनाचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने शाळेतीलच गावात राहून नौकरी करायची आहे.मात्र त्यांच्या शिक्षण विभागात कींवा जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद कार्यालयात नागपूर,तुमसर,भंडारा,तिरोडा,आमगाव आदी ठिकाणाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी अपडाऊन केले तरी चालेल का? शाळेपासून आपल्या घरापर्यंत ये जा करतांना शिक्षकांच्या माध्यमातून जर संसर्ग झाला तर कर्मचारी व अधिकारी जे अपडाऊन करतात त्याच्यापासून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.