परळी वैजनाथ दि.७:आठवडा विशेष टीम―
वारकरी संप्रदायात सुमारे सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील संतश्रेष्ठ वामणभाऊ यांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्री क्षेत्र पंढरपूरला नेण्यासाठी परवानगी देण्याच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विनंतीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनुकूलता दर्शविली आहे. बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याबाबतही ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. आज खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दूरध्वनीवरून संपर्क साधला.
पाटोदा तालुक्यात श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हे पुरातन संस्थान आहे. येथे वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या संतश्रेष्ठ वामणभाऊ यांच्या पादुका आहेत. सुमारे सव्वाशे वर्षापासुन येथील पादुका पायी दिंडीने आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाला जातात. विशेष म्हणजे गहिनीनाथ गडाच्या पालखीला मानाचे स्थान आहे आणि अगदी सुरूवातीपासूनच पन्नास हजार वारकरी सहभागी होणारी ही पालखी आहे. यावर्षी वारकऱ्यांना कोरोनामुळे आषाढी वारीला जाता येणार नाही. मात्र तरीही मानाच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गहिनीनाथ गडावरील पादुकाही मानाच्या आहेत आणि या पालखीला तब्बल १२५ वर्षाची परंपरा आहे.
खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून आज दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी गहिनीनाथ गडावरील पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठी त्यांनी अनुकुलता दर्शविली. याचवेळी बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतही मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.