गडचिरोली:आठवडा विशेष टीम― आरमोरी येथील शिवणी खुर्द या गावात दिनांक 3 जून रोजी मुंबईहून आलेले पती(वय 50वर्ष) व पत्नी (वय 40 वर्ष) यांचे कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले. मुंबई येथे पती सेक्युरीटी गार्ड म्हणून काम करत होते. 3 जून रोजी ते गावात आल्यानंतर त्यांना शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. त्यानंतर त्यांना 4 जून रोजी आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरणात हलविण्यात आले. दिनांक 5 जून रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. दिनांक 6 जूनच्या रात्री प्रशासनाकडे त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांना रात्री मुख्यालयातील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या लोकांची माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
*जिल्हयातील आणखी २ जण कोरोनामुक्त*
आज जिल्हयातील आणखी दोन कोविड-19 बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये धानोरा तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. आज दोनजण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २७ झाली. तर सद्या १५ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यापूर्वी एक जणाचा हैद्राबाद येथे दुदैवी मृत्यू झाला आहे. आज दोन जणांना दवाखान्यातून डीस्चार्ज देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे उपस्थित होते.
*मुंबई वरून आलेल्या गडचिरोली शहरातील त्या पाच पैकी बाकी तीघांचे अहवाल निगेटीव्ह*
कोरोना बाधित पती व पत्नीलाही कोणतीही लक्षणे नाहीत, उपचार प्रगतीपथावर
*दि.२७ मेला* मुंबईहून नागपूर विमानाने प्रवास करून ५ प्रवाशी गडचिरोली येथे आले. त्यापैकी ४ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यामध्ये एका कुटुंबातील तीन तर इतर वेगळे गडचिरोली शहरातील दोन प्रवाशांचा समावेश होता. त्यापैकी एक महिला गरोदर असल्याने व घरी स्वतंत्र व्यवस्था असल्याकारणाने गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यापैकी दोन म्हणजेच पती व पत्नी दिनांक ३ व ६ जूनला अनुक्रमे पॉझिटीव्ह आले होते. त्यातील तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच इतर दोन विमानातील सह प्रवाशांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे.
मुंबई वरून प्रवास करून आलेल्या पाच जणांचे २ जूनला नमुने घेण्यात आले होते. ३ जूनला १ अहवाल पॉझिटीव्ह तर ३ निगेटीव्ह आले. यातील निगेटीव्ह आलेले तीघेही अजूनही खबरदारी म्हणून संस्थात्मक विलगीकरणातच ठेवले आहेत. पॉझिटीव्ह आढळलेला रूग्ण ठेवण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरणातील इतर सर्वांचे म्हणजे ५१ लोकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यानंतर गृह विलगीकरणात ठेवलेल्या गरोदर महिलेचा अहवाल ६ जून रोजी पॉझिटीव्ह आला. त्यानंतर लगेच त्यांना सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. त्या महिलेच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या १७ व मध्यम जोखमीच्या १६ लोकांपैकी ३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी तीनही अहवाल सद्या निगेटीव्ह मिळाले आहेत. तर उर्वरीत नमुने घेणे सुरू आहे. त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या घरांत ३ मोलकरीण होत्या. सर्व मोलकरीण पॉझिटीव्ह महिलेच्या सानिध्यात आल्या नव्हत्या मात्र त्यांना त्यांच्या घरीच खबरदारी म्हणून गृह विलगीकरणात ठेवले आहे.
सर्वांत महत्वाचे गडचिरोली शहरातील ते दांपत्य मुंबई येथेच कोरोना बाधित झाले आहे. सद्या त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. त्या दोघांबरोबर प्रवास केलेले इतर तीघे निगेटीव्ह आल्याने कोरोना पॉझिटीव्ह दोघांकडून संसर्गाचा धोका ओलंडला असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. मात्र उर्वरीत तीव्र जोखमीच्या घरातील इतर लोकांचे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करता येईल असे आरोग्य विभागाने कळविले आहे.