सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खरिपाच्या हंगामाची लगभग सुरु होवूनही अद्यापही सोयगाव तालुक्यात पिककर्जासाठी नवीन शेतकऱ्यांना कर्ज तर दूरच परंतु कर्जाच्या संचीकाही पहावयास मिळत नसल्याने नवीन शेतकऱ्यांना पिककर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली असून सोयगाव तालुक्यात खरिपाच्या पिककर्ज वितरणाचा फज्जा उडाला आहे.
सोयगाव तालुक्यात ४३ हजार हेक्टरवरील ४८ हजाराच्या वर शेतकरी संख्या असून यंदाच्या खरीप हंगामासाठी १० हजाराच्यावर नवीन शेतकरी पीककर्जासाठी विसंबून असतांना मात्र नवीन उद्दिष्ट्य प्राप्त नसल्याचे सांगून बँका या नवीन पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पिटाळून लावत आहे.त्यामुळे नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज तर दूरच परंतु बँकांकडून संचीकाही मिळत नाही.त्यामुळे नवीन शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकाऐवजी सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.नियमित आणि कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांनाही बँकांकडून कर्ज मिळवून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून बँकेच्या आदेशाप्रमाणे कागदपत्रांची जुळवाजुळव न झाल्यास या शेतकऱ्यांना कर्जापासून दूरच राहावे लागत आहे.त्यामुळे अद्यापपर्यंत सोयगाव तालुक्यात १० टक्केही पीककर्जाचे वितरण झाले नसल्याची खळबळ जनक माहिती हाती आली आहे.
नियमित कर्जदारांना कागदपत्रांच्या गर्तेत-
नियमित भरणा करून दिलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कागदपत्रांच्या जुळवाजुळव मध्ये गुंतवून दिल्याने या शेतकऱ्यांची मात्र कागदपत्रे गोळा करण्यात मोठी दमछाक होत असून कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मात्र कर्ज देण्याची अद्यापही चिन्हे दिसत नाही.