सोयगाव,दि.८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पोट दुखण्याच्या आजाराने सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या सावरखेडा(ता.सोयगाव) येथील ६७ वर्षीय वृद्धेला कोविड-१९ ची बाधा झाल्याचे सोमवारी पहाटे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उघड झाल्याने सोयगाव तालुक्यात पहिल्या रुग्णाच्या प्रवेशाने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच आरोग्य,महसूल,आणि पंचायत समितीच्या पथकांनी तातडीने सावरखेडा गावाचा ताबा घेवून अक्खे गावच होमकोरोटाईन केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
पोट दुखण्याच्या आजाराने सावरखेडा ता.सोयगाव येथील महिलेला शनिवारी रात्री सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले असता सिल्लोस खासगी रुग्णालय प्रशासनाने महिलेला निमोनियाचे लक्षणे आढळत असल्याने औरंगाबादला घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले सदर महिलेचे घाटी प्रशासनाने कोविड-१९ चे स्वॅब रविवारी तपासणीसाठी घेतले या महिलेचा स्वॅबचा नमुना सकारात्मक असल्याचा अहवाल सोमवारी सोयगावला प्राप्त होताच खळबळ उडाली होती.या वृद्ध महिलेच्या संपर्कात असलेल्या कुटुंबियातील आठ जणांना सोयगावच्या कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात येवून फर्दापूर येथील तिच्या मुलाचे कुटुंबही या महिलेच्या संपर्कात आल्याने या कुटुंबातील तिघांना तातडीने होमकोरोटाईन करण्यात आले आहे.तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे,विस्तार अधिकारी केवलसिंग पाटील,आदींच्या पथकांनी सावरखेडा गावाला भेटी देवून गाव सील केले असून या महिलेच्या घराचा प्रभाग सीलबंद करण्यात आला आहे.
आरोग्य पथकाची गावभर तपासणी-
तालुका आरोग्य विभागाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावभर कोविड-१९ तपासणी करून अख्खे गाव होमकोरोटाईन करून गावातील महिलेच्या किरकोळ संपर्कात आलेल्या तीस जणांना विशेष होमकोरोटाईन करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विशेष दक्षता सूचना देण्यात येवून घराबाहेर कोणीही पडू नये अशा सूचना दिल्याचे ग्रामसेवक गणेश गवळी यांनी सांगितले असून ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे.
गावात आरोग्य पथक दाखल-
सावरखेडा ता.सोयगावला कोरोना संक्रमणाची महिला बाधित झाल्याचे आढळताच गावात आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे.आरोग्य सेविका प्रतिभा जानुनकर,अनिल महाजन,राजेंद्र कदम,यशवंत चव्हाण,अशोक रावूत,अनिल जोहरे,आदींचे पथक २४ तास तैनात करण्यात आले असून गावाच्या जवळील सिल्लोड-सोयगाव या दोन्ही तालुक्यांच्या सीमारेषा बंद करून या दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे तपासणी नाके तैनात करण्यात आले आहे.