आंबडवेत डॉ. आंबेडकर स्मारकाने वाचवले अनेकाना वादळात

रत्नागिरी दि. 08:आठवडा विशेष टीम― गेल्या 80 वर्षात असं वादळ बघितलं नाही. सारं होत्याचं नव्हतं झालं यात. हे स्मारक इथं नसतं तर अनेकांचे जीव धोक्यात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकानं आमचे जीव वाचवले, आंबडवे चे भागुराम सपकाळ सांगत होते.
निसर्ग वादळ अतिशय मोठं होतं. त्याच्या तीव्रतेचा पहिला फटका कोकण किनारपट्टीला बसला, याच भागात मंडणगड तालुक्यात उंचावरील डोंगर वस्ती म्हणजे आंबडवे हे गाव . सर्वांना परिचयाचे आहे ते संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव म्हणून.
डॉ. आंबेडकर यांचं शिक्षण झालेल्या या गावात एक स्मारक आता उभरण्यात आलयं. डोंगरमाथ्यावर रस्त्याच्या एका बाजूने मुलांचे वस्तीगृह ओलांडल्यावर गावाची सुरुवात होते. पुढे डोंगर उतारावर असणारं हे छोटे दुमदार गाव. गावात उरल्यात फक्त निसर्गाने दिलेल्या वादळखुणा.
जिल्ह्याचे पालकमंत्री ऍ़ड. अनिल परब यांनी या गावाला भेट दिली. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर स्मारकात थांबलेल्या काही जणांशी संवाद साधला.
भागुराम सकपाळ यांनी नेमकेपणानं काय घडलं ते कथन केलं. माझे हे गाव, नोकरीसाठी मुंबईत होतो, निवृत्ती पासून गावातच आहे. गेल्या 80 वर्षात असं वादळ प्रथमच आलं सांगताना ते म्हणाले की हे रात्री घडलं असतं तर अनेक जणांचे जीव गेले असते आणि या स्मारकात सर्व गावकऱ्यांनी आसरा घेतल्याने सर्व बचावल्याचे ते ते म्हणाले.
गावात असणाऱ्या प्रत्येक घरावरील छत आता शिल्लक नाही . काहींच्या घरावर पत्रे होते तर काहींच्या घरावर कौल. आता गावभर त्याचे तुकडे विखुरलेले आहेत. साधारण 200 मीटर वर असणारी जिल्हा परिषद शाळा देखील पत्रे उडालेल्या स्थितीत आहे.
पालकमंत्री ऍ़ड. परब यांनी सर्वांशी संवाद साधला. लवकरात लवकर मदत मिळेल असा शब्द दिला. तातडीने लागणाऱ्या वस्तूंमध्ये घरावर किमान प्लॅस्टिक अच्छादन, कंदिलांसाठी रॉकेल लागणार आहे. कारण प्रचंड गतीच्या निसर्गाने विविध यंत्रणा पूर्णपणे उध्वस्त केलीय. वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागणार आहे.
वादळानंतर गावची अवस्था आणि त्यावर शिल्लक वादळखुणांमुळे काय घडलं याची कल्पना येते. अशा स्थितीत कोरोडांना आयुष्याची दिशा दाखविणाऱ्या व आयुष्य बदलणाऱ्या महामानवाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मारकाने लोकांचे जीव वाचवले हेच खरं. याच भावनेतून स्मारकातील प्रतिमांना वंदन करून पुढच्या गावाकडे आम्ही निघालो.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.