चंदुलाल बियाणी यांचे ना.धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हाधिकार्यांना निवेदन
परळी:आठवडा विशेष टीम―
परळी शहरातून जाणार्या डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मागील काही दिवसांत झालेल्या अपघातात जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली असून पुलावरील अवजड वाहनांची वर्दळ थांबवत पर्यायी बायपास रस्ता तातडीने करुन वाहनधारकांना सुरक्षीतता द्यावी, अशी मागणी बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.
प्रस्तूत निवेदनात चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे की, परळीतील उड्डाणपुल मागील अनेक वर्षापासून अवजड वाहनांच्या वाहतुकीला तोंड देत असून 1996 ला बांधलेला पुल अनेक ठिकाणी जिर्ण झाला आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याआधी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, पुलावरील अपघात टाळण्यासाठी येणार्या-जाणार्या वाहनांना शिस्त ठेवण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजून वाहतुक पोलीस नियुक्त करावेत, अवजड व परळी शहरातून बाहेर जाणार्या वाहनांसाठी भुमिपूजन झालेला बायपास रस्त्याचे तातडीने काम सुरु करावे, रेल्वे रुळाखालून छोट्या वाहनांसाठी मंजूर असलेल्या भुमिगत रस्त्याचे (बोगदा) काम त्वरित सुुरु करावे असे पर्याय या निवेदनात नमुद केले आहेत.
उड्डाणपुलावर लॉकडाऊनच्या संचारबंदीत अनेक लहान-मोठे अपघात झाले असून यामध्ये तिघा जणांना आपला जिवही गमवावा लागला. औष्णिक विद्युत केंद्र, सिमेंट कंपनी यांच्यासह राख, वाळू, एस.टी. बसेस, विविध शैक्षणिक संस्थांच्या स्कुल बसेस या रस्त्यावरुन धावत असल्याने वाहनधारकांना सुरक्षीतता मिळत नसल्याकडेही चंदुलाल बियाणी यांनी लक्ष वेधले आहे. परळीकरांच्या सुरक्षीत व सुरळीत वाहतुकीसाठी ना.धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून पर्यायी रस्त्यासह सुरक्षेसाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन या निवेदनात जिल्हा नियोजन समिती सदस्य चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.