सोयगाव,दि.१०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सावरखेड्यातील बाधित महिलेच्या कुटुंबियातील दोघांचे स्वॅब सकारात्मक आल्याने सावरखेडा गावात पुन्हा दोन कोविड-१९ ची बाधा झालेल्या रुग्ण आढळल्याने सोयगाव तालुका हादरला आहे.कोरोना बाधितांची सोयगाव तालुक्याची संख्या तीनवर पोहचली आहे.सोयगावच्या विलीगीकरण कक्षातील दोघांचे सकारात्मक अहवाल प्राप्त होताच तालुका आरोग्य विभागाने या दोघांना तातडीने मिनी घाटी औरंगाबाद येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी रवानगी केली.
सावरखेड्यातील ६७ वर्षीय वृद्ध महिला सोमवारी औरंगाबादला सकारात्मक आढळल्याने या महिलेच्या संपर्कात असलेल्या कुटुंबियातील आठ या व्यतिरिक्त फर्दापूर आणि बुलढाणा येथील प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा असे १४ जणांना तालुका आरोग्य विभागाने सोयगावच्या कोविड केंद्रात विलीगीकरण केले होते या १४ जणांचे स्वॅब मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात येवून त्या स्वॅबचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये ७२ वर्षीय वृद्ध(पुरुष)आणि ३५ वर्षीय विवाहिता सकारात्मक असल्याचा अहवाल प्राप्त झाला उर्वरित १२ जणांचे अहवाल नकारात्मक मिळाले आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात पुन्हा नवीन दोन कोविड-१९ चे रुग्ण वाढले आहे.यामुळे आरोग्य विभागासह तालुका प्रशासन हादरले आहे.या नवीन सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांची तातडीने तपासणी करून त्यांना कोविड-१९ ची बळकट लक्षणे नसल्याने होमकोरोटाईन करण्यात आले आहे.
सावरखेड्यात आरोग्य विभागाची कोविड-१९ तपासणी मोहीम-
सावरखेडा ता.सोयगाव गावात कोविड-१९ चा विषाणू घोंगावला असल्यामुळे गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात येवून गावातील ग्रामस्थांची कोविड-१९ तपासणी करण्याचे काम आरोग्य विहागणे हाती घेतले असून गावात आरोग्याच्या ७ कर्मचार्यांचे पथक तळ ठोकून आहे.आरोग्य सहायिका प्रतिभा जाणूनकर,अनिल महाजन,अनिल जोहरे,अशोक रावूत,राजेंद्र कदम,आदींचे पथक तळ ठोकून आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती ,गावात संचारबंदी-
ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना योग्य काळजी घेवूनच शेती कामांसाठी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.ग्रामसेवक गणेश गवळी आदींचे पथक गावात नागरिकांना घरातच राहण्याबाबत आवाहन करत आहे.