गोंदिया दि.१०:बिंबिसार शहारे― कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग आज मोठ्या संकटात सापडले आहे.अनेक देशात मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहे.बाधित झालेले काही लोक मृत्युमुखी पडत आहे.मात्र गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे.आज कोरोना हारला आणि गोंदिया जिंकला.तरीही यापुढे कोरोनाची कोणालाही बाधा होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.आज 10 जून रोजी जिल्ह्यातील शेवटचा कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. हा रुग्ण अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरत असतांना जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.याला सर्व नागरीक आणि लोकप्रतिनिधींची साथ मिळाली.
त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुकतीसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची साथ तर मिळालीच सोबत आरोग्य विभागाने सर्व कोरोना बाधित रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार देखील केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना सकस आणि पोटभर जेवण दोन्ही वेळ दिले.त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली.रुग्णांनी देखील या आहाराबाबत समाधान व्यक्त केले.जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही.
जिल्ह्यात जे कोरोना बाधित रुग्ण आढळले ते 26 मार्चला एक रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण, 21 मे रोजी सत्तावीस रुग्ण, 22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण,25 मे रोजी चार रुग्ण,26 मे रोजी एक रुग्ण,27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी 9 रुग्ण, 29 मे तीन रुग्ण,30 मे रोजी चार रुग्ण,31 मे रोजी एक रुग्ण,2 जून रोजी दोन रुग्ण असे एकूण 69 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. 2 जून ते 10 जून या आठ दिवसाच्या कालावधीत नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
जिल्ह्यातील 1129 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 69 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. 22 नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील चाचणी प्रयोगशाळेतील तपासणी केंद्रात प्रलंबित आहे. सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आज शेवटचा एक रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला.विविध शाळा व संस्थांमध्ये 1574 आणि घरी 1743 असे एकूण 3317 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.