अहमदनगर, दि.१०:आठवडा विशेष टीम― कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. केवळ राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर सुध्दा कोरोना संसर्गावर लस आणि औषध शोधण्याचा प्रयत्न होत आहे. टास्क फोर्स च्या माध्यमातून राज्य स्तरावर काम सुरू आहे. आपण जिल्ह्यातही चांगले काम करत असून रुग्णांना बरे करणे यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात श्री. मुश्रीफ यांनी आज कोरोना उपाय योजना, निसर्ग चक्रीवादळा मुळे झालेले नुकसान, खरीप हंगाम पीक कर्ज वाटप आदींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जो टास्क फोर्स नेमला आहे. त्याचे मार्गदर्शन घेऊन जिल्ह्यात रुग्ण मृत्यू होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आजच आपण २० रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
आज जिल्ह्यात 1029 होम क्वारंटाईन आहेत. आता गावागावांमध्ये जे परगावाहून आलेले लोक आहेत, त्यांना गावातच संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आज अखेर 6963 व्यक्ती तेथे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्याकडे निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनाऱ्याच फार मोठ नुकसान झाले. काल मंत्रीमंडळाची बैठक झाली. यात कोकणवासीयांना पुन्हा एकदा उभे करण्याचा निर्धार काल मंत्रिमंडळाने केला आहे. आपल्या जिल्ह्यातही काही तालुक्यांना त्याचा फटका बसला. अकोल्यामध्ये दुर्दैवानं एक मृत्यू पावला त्याचा कुटुंबीयांना आपण चार लाख रुपयाची मदतीचा धनादेश नुकताच प्रदान केला आहे. मुख्यमंत्री निधीतून एक लाख असे एकुण पाच लाख रुपये आपण मदतीच्या स्वरूपात दिले. त्याप्रमाणे जनावरे दगवण्याच्या आणि शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाने केवळ दोन दिवसात पंचनामे करण्याचे काम पूर्ण केले. या नुकसान झालेल्या क्षेत्राला आवश्यक मदत लवकर मिळेल, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने नियमितपणे हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेऊन ज्या भागात या वादळाचा फटका बसणार होता तेथे पूर्व काळजी घेतल्याने कमी प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळेल हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करत कामा नये.
जिल्हयातील जवळपास ४७ हजार शेतकऱ्यांना काही तांत्रिक कारणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र अशा शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे त्यांनाही कर्ज वेळेवर देण्याची जबाबदारी बँकावर असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
सध्या आपल्याकडे बियाणे आणि खते किती उपलब्ध आहे, याचा आढावा घेऊन त्यांनी खते आणि बियाणे विक्रीबाबत लिंकेज होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. आपल्याकडे 2 ते 3 महिन्यापासून मजूर व बाराबलुतेदारांना काम नाही म्हणुन आपण त्यांना धान्य वितरण योजना राबवली आहे. आपण डाळ मोफत द्यायला सुरु केली होती. गेल्यावेळेस तूरडाळ दिली असेल तर यावेळेस आपण अर्धा किलो चणा डाळ देण्यात येईल. गेल्या वेळेस चणा डाळ दिली असेल तर यावेळेस अर्धा किलो तूरडाळ देण्यात येईल. ज्यांचाकडे राशन कार्डच नाही त्यांनाही आपण धान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत.