अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येत्या 15 जूनपासून 30 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे वृत्त निखालस खोटे व चुकीचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने खुलासा करण्यात येत आहे की, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अद्याप असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
त्याचबरोबर या वृत्तामध्ये नागरिकांनी महत्त्वाचे सामान व पेट्रोल भरणे त्याचबरोबर जिल्ह्यात सीआरपीएफ आणि मिलिटरीचे जवान बोलविण्यात येणार असल्याचीही अफवा पसरविण्यात येत आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये.
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
त्याचबरोबर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल अशा खोट्या अफवा व संदेश कोणीही पसरवू नये. जे कोणी असे खोटे मेसेज पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करतील. त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.