सोयगाव,दि.११:आठवडा विशेष टीम―
सोयगावच्या वीज उपकेंद्रातील पाचही फिडरचे रिले आणि डी.सी वीज पुरवठ्याची मुख्य केबल निकामी होवून जळाल्याने सोयगावच्या वीज उपकेंद्राचा तब्बल २० तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला असल्याने गुरुवारी पहाटे पासून वीज कर्मचाऱ्यांनी वीज सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली,परंतु सायंकाळपर्यंत या मोहिमेला यश न मिळाल्याने अखेरीस जिल्हा पातळीवरील वीज पथकाला सोयगावला पाचारण करावे लागले होते.
सोयगाव शहराला गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक वादळी वारा आणि पावसाने तडाखा दिल्याने या वादळी वाऱ्याचा व पावसाचा सोयगावच्या वीजउपकेंद्राला फटका बसला असून या वीज उपकेंद्रातील पाचही फिडरच्या रिले व मुख्य पुरवठा करणाऱ्या डी.सी केबल जळून निकामी झाली होती,सोयगावच्या स्थानिक वीजकर्मचाऱ्यांनी पहाटे सहा वाजेपासून या दुरुस्तीला हाती घेतले परंतु सायंकाळपर्यंत हाती घेतलेल्या रेस्कू मोहिमेत काही भागाचा बिघाड दूर झाला असतांना मात्र फिडरचे रिले स्टेबल होत नसल्याने अखेरीस सायंकाळी जिल्हा महावितरणच्या पथकाला सोयगावला पाचारण करण्यात आले होते.या पाच फिडरवर सोयगावसह गल वाडा,कंकराळा,वाडी,माळेगाव,पिंपरी,आमखेडा या सात गावांचा वीज पुरवठा जोडणी करण्यात आला आहे.परंतु अचानक झालेल्या रिलेच्या बिघाडामुळे या सातही गावांचा वीज पुरवठा तब्बल २० तासांपासून खंडित झालेला होता.महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर,पप्पू पाटील,जनार्दन जोहरे,विष्णू नगरे,सुनील पाटील,शेख अली,आदींसह पथकाने तब्बल १० तास मोहीम हाती घेतली.परंतु रिलेच मिळाले नसल्याने अखेरीस सायंकाळी उशिरा जिल्हा महावितरणच्या पथकाला दुरुस्तीसाठी पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत सोयगावचा वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.