बीड जिल्हा

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या गौरवाची शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" ने घेतली दखल

बीड,दि.१३ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बीड जिल्हा देशात प्रथम ठरला, याबाबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या गौरवाची राज्य शासनाच्या मुखपत्र ¬'लोकराज्य' मधे दखल घेण्यात आली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मुखपत्राच्या फेब्रुवारी २०१९ च्या अंकाचे नुकतेच मुंबई येथे अमिताभ बच्चन आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 'शेती विकासाचा डिजीटल अध्याय', स्वच्छता ही सेवा आदी विषयावर असलेल्या या अंकामध्ये 'पीक विमा बीडचे यश' हा विशेष लेख प्रसिध्द झाला आहे. यातून योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
जिल्हयातील विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करताना, श्री.सिंह यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वेग आला. यापैकी प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला.
जिल्हयातील ६ लाख ५१ हजार शेतकऱ्यांपैकी ५ लाख ४३ हजार २०० अशा ८३ टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत समावेश करुन बीड जिल्हा प्रशासनाने अव्वल कामगिरी केल्याने राष्ट्रीय पातळीवर ह्याची दखल घेण्यात आली.
'लोकराज्य' मध्ये पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन, यासाठी नियोजन व जनजागृतीसह समाज माधमांचा प्रभावी वापर केल्याचे नमूद करुन यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करताना लाभार्थ्यांच्या भेटी, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन व सूचना देखील महत्वाच्या ठरल्याआहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना फेब्रुवारी २०१९ चा 'लोकराज्य' चा अंक जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिला. यावेळी स्वीय सहाय्यक श्री. लिंबकर,माहिती अधिकारी किरण वाघ,दूरमुद्रकचालक श्रीमती बी.जी. अंबिलवादे, छायाचित्रकार कृष्णा शिंदे उपस्थित होते. विविध लेख,प्रेरणादायी यशकथा असणा-या "लोकराज्य" मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये असून या अंकाचे वर्गणीदार होण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय,प्रशासकीय इमारत, नगर रोड,बीड येथे संपर्क साधावा.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.