बळीराजाच्या एका खांद्यावर कोरोनाचे संकट; तर दुसऱ्या शेतीची जबाबदारी !
पाटोदा दि.१३:नानासाहेब डिडूळ― गेल्या दोन दिवसात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने पाटोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध ठिकाणच्या तलावांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली असून जमिनीला उत्तम ओल झाल्याने आणि बहुतेक ठिकाणच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याने बळीराजाची लगबग जोरात सुरू आहे.
गेल्या दोन चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांना विविध संकटांनी ग्रासले .दरम्यान यंदा गेल्या तीन महिन्यापासून कोरोना चे संकट जगभरात महामारी च्या स्वरूपात आल्याने इतर विविध क्षेत्रातील घटकांबरोबरच जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरीही मेटाकुटीला आला…
कोरोना च्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यातही बळीराजाने घरात न बसता उन्हाळ्यामध्ये शेतीची कामे करून आपला घाम गाळला. प्रशासनाला मदत करत करत आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून वरूण राजाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील विशेषतः पाटोदा तालुक्यातील आठेगाव पुठ्याचा भाग आणि परिसरात शेतीला उत्तम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी इकडून तिकडून करून बी बियाणे आणि खते उदार उसनवारीवर घेऊन या भूमीची ओटी भरली !
दरम्यान, तालुक्यातील पश्चिमेकडील बीड नगर राज्य मार्गाच्या सौताडा सावरगाव मुगाव चिखली चिंचोली अमळनेर पिंपळवंडी आदीसह सुपा आणि लांबरवाडी तसेच आठेगाव पट्ट्यातील परिसरामध्ये काल दुपारी एक ते दीड तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे पेरणी झालेल्या शेतीतील काही पिके थापटून गेली तर काही पिके निघू लागले आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान ही झाले आहे त्यामुळेकाही ठिकाणी दुबार पेरणीचे ही संकट नाकारता येत नाही.
एकंदरीत कोरोणा मध्ये बळीराजाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आणि पोटाची भूक भागवण्यासाठी अन्नाच्या उत्पादन क्षमतेसाठी भूमीची ओटी भरली. आज त्याच्या मनात आशादायी वातावरण असून उद्याच्या आशेवर दैनंदिन कुटुंबातील विविध प्रश्न सहन करून कोरुणा संदर्भात प्रशासनालाच साथ देत आपला घाम गळून पीक उत्पादनासाठी रात्रंदिवस एक करत आहे
पिक कर्ज तात्काळ द्यावे
शेतकऱ्या संदर्भात पूर्वीचे कर्ज माफ केल्याचे कळवून तात्काळ त्यांना पिक कर्ज जास्तीचे वाटप करून यंदाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये शासन आणि प्रशासनाने आधार देऊन या बळीराजाला आत्मविश्वास वाढवून देशाच्या एकूण उत्पादनात भर घालण्यासाठी सहकार्य करावे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे.
जनजागृती आणि मार्गदर्शनाची गरज
सद्यस्थितीत कोरूना संकटामुळे समाजातील विविध घटक चिंताग्रस्त आहेत; बळीराजाला बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. दरम्यान, शेतकरी घटकांना भविष्यातील त्याला दिशा समजावी आणि आधार पोहोचावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन आणि जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा आहे.
फळबागांना प्रोत्साहन द्यावे
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. ” या न्यायाने तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांना पुरेशा पाण्यावर फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देऊन त्यांना त्यासाठी उद्युक्त करावे, या अनुषंगाने कृषी विभागाने पुढाकार घेऊन प्रशासनाच्या वतीने त्यांना सहकार्य करावे, जेणेकरून फळ बागांमधून अनुदान आणि भविष्यातील उत्पादन यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकेल.
―अंकुश लांबरुड (शेतकरी)