बीड, दि.१३:आठवडा विशेष टीम― परळी शहरातील माधवबाग-शारदानगर येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत .
याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परळी शहरातील भगवान बाबा चौक ते माधवबाग-शारदानगर येथील आश्रुबा मुंडे यांच्या टी हाऊस पर्यंत हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.