बीड दि.१३:नानासाहेब डिडुळ―
खरीप हंगामाला आता काही दिवसात सुरुवात होईल त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची कामे करायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना त्याविषयी अधिकाधिक तांत्रिक माहिती मिळावी या हेतूने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र दिघोळआंबा व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिओ कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर इत्यादी पिकाविषयी नियोजन कसे असावे याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बियाण्याची निवड करताना चांगल्या जाती, बियाण्यांची उगवनाशक्ती तपासणे, बियाण्याला बीजप्रक्रिया करणे खूप महत्वाचे आहे हे प्रामुख्याने सांगण्यात आले, जिवाणू खतांचा वापर, बुरशीनाशकांचा वापर, कीड व रोग नियंत्रणासाठी सापळा पिके व फेरोमेन ट्रॅप यांचा वापर, खताचे नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच अधिक उत्पादन व्हावे या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र दिघोळआंबा येथील शास्त्रज्ञ श्री कृष्णा कर्डीले व श्री सुहास पंके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी मोबाईल फोन द्वारे सहभाग घेतला होता. शेतीविषयक इतरही काही समस्या असल्यास रिलायन्स फाउंडेशनच्या 18004198800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम सहाय्यक विजय खंडागळे यांनी प्रयत्न केले.