अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हालेखसामाजिक

छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज ''वसा आणि वारसा''

लेखक -शिवश्री रामकिसन गुंडीबा मस्के (सर)―

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणारे, धर्मसुधारणा, अंधश्रध्दा विरोध, जातिनिर्मुलन, राजकीय सत्तेत समान वाटा, राखीव जागा, शेतीसुधारणा व अधिकारासाठी संघर्ष हे सत्यशोधक विचार स्वीकारुन आचरणात आणणारे, परिवर्तनवादी विचारवाहक, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांना विनम्र अभिवादन....!
  वर्तमानाचे भान ठेवून असतात तेच इतिहास घडवतात, भविष्याचे वेध ज्यांना लागलेले असतात आणि परिवर्तनासाठी जे झपाटून गेलेले असतात तेच इतिहास घडवतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज ज्यांनी स्वत:च्या संबंध आयुष्यात जातीधर्मातील भेदाला कधीच थारा दिला नाही ते छत्रपती राजर्षी शाहुजी महाराज आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची विशालता लक्षात घेतली तर त्यांचे वारस असावेत कसे तर ते असावेत सरकारी निमसरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागा ठेवल्यास समर्थन देणारे, सर्व जाती-जमातींना त्यांच्या शिक्षण, संख्येप्रमाणे शासकीय निमशासकीय नोकरीत तसेच राजकीय प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे याचे समर्थन करणारे जातनिहाय जनगणना व्हावी याचे समर्थन करणारे चातुरवर्ण्य व्यवस्था,सतीप्रथा,उच-नीचता म्हणजेच मनुस्मृती नाकारणारे या विचारांचे 26 जुलै 1902 रोजी छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी आपल्या संस्थानात 50% जागा राखीव ठेवून आरक्षणाची संकल्पना अमलात आणली व ते आरक्षणाचे जनक ठरले. समाजात नोकऱ्या न मिळाल्यामुळे अनेक तरुण वाईट मार्ग स्वीकारतात अशा या तरुणांना अंगरक्षक, पहारेकरी,रथावर वाहक तसेच जमिनी देऊन प्रतिष्ठेचे जीवन जगण्यास प्रोत्साहित केले.मणभर विचारांपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ या उक्तीप्रमाणे कृतींवर भर देणारे ते एक कार्यकर्ते राजे ठरले.त्यांच्या काळातील स्त्रियांची स्थिती विदारक होती.स्त्रियांसाठी त्यांनी स्त्रीशिक्षणास चालना देऊन विधवा विवाह आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन स्त्रियांना माणुसकीचे सर्व हक्क प्रदान करण्याचे मोलाचे कार्य छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी केले.
  शिक्षण हा राष्ट्रोन्नतीचा सर्वात महत्वाचा भाग. छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शिक्षण सक्तीचे केले. जर मुलगा शाळेत आला नाही तर पालकांना दंड केला. अनेक जाती-जमातींसाठी त्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था केली.त्याकाळी कोल्हापुरात वसतिगृहांची पहिली स्थापना झाली म्हणुन आज कोल्हापुराला वस्तीगृहाची जननी म्हणुन ओळखले जाते.शाळेत स्पृश्य-अस्पृश्य भावना मोडीत काढाली.सर्व जाती-जमातीच्या मुलांना समानतेची वागणुक देण्यासाठी कायदा केला. दीन-दलित, गोर-गरीब, शेतकरी-कष्टकरी यांच्या मुलामुलींना शिक्षणांच्या सोई उपलब्ध करवून दिल्या.दीनदलितांना जवळ केले.स्वातंत्र्यलढयासाठी छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांची भुमिका स्पष्ट होती. मुठभर लोकांच्या हातात स्वराज्य जाता कामा नये. त्यासाठी आपण पात्र झाले पाहिजे म्हणजेच शिक्षण घेतले पाहिजे. जातीभेद गाडले गेले पाहिजेत,राजकीय आणि सामाजिक सुधारणा बरोबर झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी कार्य केले.आज ज्या लोकशाही पद्धतीवर आपला देश चालतो आहे त्या लोकशाही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्याकाळी मोलाचे सर्व सहकार्य देण्यात सिंहाचा वाटा असलेले हेच ते छत्रपती राजर्षी शाहुजी महाराज ज्यांच्या प्रतिमेवरच प्रेम मर्यादित न ठेवता विचारांचा जयजयकार करुन चित्राची पुजा न करता चारित्राची पुजा करणे, उत्सवाच्या गदारोळात विचारांची होरपळ होणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.
  आज छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांचे स्मरण करताना त्यांचा वसा आणि वारसा कोणता हे आपणास पाहावे लागेल. जयजयकार करणारे कोण खरे आणि कोण खोटे हे तपासावे लागतील. त्यांचा हेतु तपासावा लागेल जातिपरिषदा असाव्यात परंतु जातीच घट्ट होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. जाति परिषदा भरवून माणसांची मने ही शिक्षणाने सुसंस्करित, उच्च दर्जाची, मानवजातीचे कल्याण करणारे होतील याचा जागर करावा. आणि विशेष म्हणजे जाति परिषदांच्या माध्यमातून जातिअंताचा लढा उभा करावा.आज बहुजनातील मोठा भाऊ “कुणबी मराठा आरक्षण" हा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना फक्त आरक्षण मिळालेच पाहिजे असे न म्हणता इतर सर्व समाज बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल यावर विचारविनिमय होऊन प्रश्न मार्गी लावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. छत्रपती शाहुजी महाराजांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी शेतात केलेली सिंचन व्यवस्था ज्यामुळे आज कोल्हापुरातील राधानगरीसारख्या धरणामुळे भाग सुजलाम सुफलाम आहे.त्यांची हीच दृष्टी आजच्या राजकीय वर्गामध्ये येणे गरजेचे आहे.जेणेकरुन शेतकऱ्यांच्या जमिनिला भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा होऊन,शिवार जलसंपन्न झाल्यामुळे मुबलक प्रमाणात उत्पादन निघेल व उत्पादन खर्चावर शेतीमालाला बाजारात हमीभाव मिळेल तरच शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. छत्रपती शाहुजी राजांच्या काळात शेतकरी आत्महत्यामुक्त होता ही बाब लक्षात घेऊन आजघडीला आत्महत्यामुक्त शेतकरी होण्यासाठी शासकीय व राजकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.शेतकरी कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या लेखणीला धार आणि त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड मिळाली तर उद्या राष्ट्राची प्रगती निश्चित आहे.यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक सवलती देऊन शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षण आणि नोकरी देणे महत्वाचे आहे.व्यसनाने तरुणवर्ग बरबाद होत चाललेला असताना व्यसनमुक्त तरुण होण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. जातिजातीमध्ये होणाऱ्या दंगली या समाजाच्या विनाशास कारणीभुत आहेत म्हणून आपला महाराष्ट्र दंगलमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्नात्मक पावलं उचलणं गरजेचे आहे.छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी घेतलेला कार्याचा वसा आणि त्यांचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी आजपासून आपण सर्वजण सज्ज होऊयात यासाठी सर्वांना हार्दिक आणि उदंड शुभेच्छा..!

  “थांबवूया त्यांची लूट,
  ज्यांची चाढयावर मूठ.
  करुया नेहमीकरीता दूर,
  घरातील त्यांच्या तिमिर.
  घेऊन शाहुजींचे विचार,
  उद्धार बळीराजाचा करुया. पिढ्यान्‌-पिढ्या छळले ज्यांनी,
  पुरुनि त्यांना उरुया."उरुयाजय जिजाऊ,जय शिवराय
  जय ज्योति,जय भिमराय
  जय शाहुजी ...

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.