ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

मतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ठोठावली कारावासाची शिक्षा, जिल्हा न्यायाधीश केदार यांचा न्यायनिर्वाळा

चंद्रपूर:राहुल उके― जिल्ह्यातील घुग्घुस पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंचशील वार्ड क्रमांक १ मधील मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दीपक ऊर्फ वारलु तुकाराम कामतवार (४५, रा. घुग्घुस) यास २३ जून रोजी चंद्रपूर येथील जिल्हा न्यायाधीश व क्रमांक २ चे सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मतिमंद मुलगी ही दुपारच्या सुमारास आपल्या घरी एकटी असताना आरोपी दीपक कामतवार याने तिच्या घरी जबरीने जाउन तिचा विनयभंग केला. याबाबतच्या फिर्यादेवरून पोलिस स्टेशन घुग्घुस येथे अपराध क्रमांक ४००/२०१८ भादंविच्या कलम ३५४, ३५४ (ए) (२), ४५२, सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (आय), ३ (२) (व्ही) अ. जा. ज. प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व पुराव्याच्या आधारे आरोपी दीपक कामतवार यास भादंवि कलम ३५४ अन्वये ४ वर्षे कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा, कलम ३५४ (ए) (२) अन्वये २ वर्षे कारावासाची शिक्षा व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा, ४५२ अन्वये ४ वर्षे कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकारतर्फे चंद्रपूर येथील सरकारी अभियोक्ता ॲड. संदीप नागपुरे, कोर्ट पैरवी म्हणून पोलिस नाईक अशोक उराडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.