सोयगाव,ता.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडीसह शिवारात आठवड्यापासून भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून बुधवारी मध्यरात्री शेतकऱ्याचे वीजपंपाचे स्टार्टर आणि वीजपंपाची केबल असा ६ हजाराचा मुद्देमाल भुरट्या चोरांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे.या प्रकरणी चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने मात्र सोयगाव पोलिसात तक्रार देण्याचे टाळले होते.
जरंडी गावालगत असलेल्या गोकुळसिंग पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या वीजपंपाच्या इलेक्ट्रिक संचातून कडी कोयंडा तोडून स्टार्टर आणि वीज पंपाची जोडणी करण्यात आलेली कॉपरची केबल व घोसला शिवारात व वेंकटेश माणिकराव कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युतपंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.जरंडी व घोसला शिवारात भुरट्या चोरट्यांनी मोठा उच्छाद मांडला असून आठवडाभरापासून या परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे,त्यामुळे शेतकरी वैतागले असून सोयगाव पोलिसांनी या भागात गावालगत रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे.