जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडीसह परिसरात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपाच्या पिकांवर ताण पडला आहे.यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि फवारणीच्या मात्रा देवून पिकांना जगविण्याची धडपड सुरु केली आहे.पावसाचा मोठा खंड पिकांना तारणारा नसून मारणारा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे.
जरंडी परिसरातील मंडळ महसुली गावांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला असून त्यामुळे खरिपाच्या हंगामावर पावसाअभावी ताण पडला असल्याने खरीपाची आंतर मशागतीचे कामे रखडली आहे.पिकांना पुन्हा डोलदार करण्यासाठी जरंडी,घोसला परिसरात खतांच्या मात्रा आणि फवारणीच्या कामांनी वेग घेतला असून कपाशी पिकांवर तूर्तास मित्र किडींचा मोठा प्रादुर्भाव असल्याने कपाशी पिके धोक्याच्या बाहेर आहे.परंतु पावसाचा मोठा ताण कपाशी आणि मका पिकांवर पडलेला असल्याने मक्याची कोवळी पिके माना टाकत असल्याचे शिवारातील चित्र आहे.मक्यासह सोयाबीन,ज्वारी,बाजरी आदी पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून कपाशी पिकांना मात्र ठिबक सिंचनच्या मात्रा वर जगविले जात आहे.त्यामुळे खरिपाच्या हंगामातील मक्यास,सोयाबीन,ज्वारी,बाजरी आदी पिके मात्र संकटात सापडली आहे.
ढगाळ वातावरणाचा परिणाम-
जरंडीसह परिसरात आठवडाभरापासून पावूसाचा पत्ता नसून मात्र दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने या बदलत्या वातावरणाचा खरिपाच्या पिकांवर मोठा परिणाम जाणवत असून पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने खरिपाच्या मका,सोयाबीन,ज्वारी,बाजरी आदी पिकांची वाढ खुंटली आहे.वाढ खुंटल्याने पिकांना योग्य प्रमाणात उभारी मिळत नाही त्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी आणि पावसाअभावी खरीपाची सर्वच पिके अडचणीत सापडली आहे.यावर मात्र कृषी विभागाच्या कोणतेही मार्गदर्शन मिळत नसून शेतकरी पावसाची दडी आणि बदलत्या वातावरणाच्या विळख्यात अडकला आहे.