ना. पंकजाताई मुंडे यांची सावरगांवच्या भगवान भक्ती गडाला भेट

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाच्या कामाची केली पाहणी
पाटोदा दि. १७ : संत मीराबाई संस्थानच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त महासांगवी येथे आलेल्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सावरगांव घाट येथे धावती भेट देऊन भगवान भक्ती गडावरील राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे ना. पंकजाताई मुंडे यांनी सन २०१७ मध्ये दसरा मेळावा घेऊन याठिकाणी भगवान बाबांचे भव्य दिव्य देखणे स्मारक उभारण्याचा संकल्प केला होता. मागील वर्षी दसरा मेळाव्यानिमित्त हा संकल्प पूर्ण करत संत भगवान बाबांच्या भव्यदिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांनी येथे केली. महासांगवी येथील कार्यक्रम आटोपून आज दुपारी त्या हेलिकॉप्टरने सावरगाव घाट येथे पोहोचल्या. याठिकाणी संत भगवानबाबांच्या भव्य मुर्तीसमोर त्या नतमस्तक झाल्या. भगवान भक्ती गड स्मारकाच्या कामाची पाहणी करून तेथील ध्यान मंदिरातही त्यांनी काही काळ घालवला. यावेळी उपस्थित असलेल्या
सावरगाव घाट येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. गावातील सहाशे कुटूंबियांनी पावसाळ्यात किमान सहाशे वृक्षांची परिसरात लागवड करून त्यांची जोपासना करावी असे आवाहन त्यांनी केले. भगवान बाबांच्या जन्मगांवी असलेले हे भव्य स्मारक देशाच्या नकाशावर आले आहे. प्रत्येक दिवशी गावांतील एका कुटुंबाने बाबांची पूजाअर्चा करावी असेही त्यांनी सांगितले.
केवळ भिंती नाही तर बाबांचे विचार व संस्कार बांधायचे आहेत
राष्ट्रसंत भगवान बाबा हे विज्ञानवादी संत होते .बाबांनी आधुनिक विचारांचा पुरस्कार करताना अंधश्रद्धा व समाजातील रूढी परंपरांविरुद्ध प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृती केली तसेच मागासलेल्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन केली. स्मारकाच्या आपल्याला केवळ भिंती बांधायच्या नाहीत तर त्यांचे विचार व संस्कार जोपासायचे आहेत असे त्या यावेळी म्हणाल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गोल्हार, रामराव खेडकर ,रामदास बडे, काकासाहेब लांबरूड, आजिनाथ सानप, सुधीर घुमरे, संदेश सानप, प्रवीण सानप, सरपंच रामराव सानप, इंदरबापू सानप आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.