जरंडी दि.०२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
महावितरणच्या वीजबिल वसुलीत अव्वल असलेल्या जरंडी गावाला मात्र किरकोळ बिघाडाअभावी बुधवारी रात्रभर अंधारात राहावे लागले होते.जरंडी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या किरकोळ पावसाने गावपुरवठ्याच्या रोहित्रावर झालेल्या बिघाडामुळे अक्खे गाव रात्रभर अंधारात होते त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती.
रोहित्रावर झालेल्या किरकोळ बिघाड दूर करण्यासाठी महावितरणच्या वीज मंडळाच्या पथकाला बिघाड दूर करण्याची तसदी न घेतल्याने वसुलीत अव्वल असलेल्या ग्रामस्थांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागल्याने मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.अख्खे गाव ऐन आषाढी एकादशीला अंधारात असल्याने रात्रभर गावभर मोठा गोंधळ उडाला होता.जरंडी परिसरात महावितरणच्या रोहीत्रांना मोठा धोका झालेला असतांना देखील याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप संघपाल सोनवणे यांनी केला असून रात्री गुल झालेला जरंडी गावाचा वीज पुरवठा गुरुवारी पहाटे सुरळीत करण्यात आला होता.
तासभराच्या बिघाडासाठी १४ तास वीजगुल-
गुरुवारी पहाटे केवळ तासभरात हा बिघाड दूर करण्यात आला असून तासभराच्या बिघाडामुळे जरंडी गाव १४ तासांपासून विजेच्या प्रतीक्षेत राहिले होते.