मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षयकुमार यांची उपस्थिती
• १२ एकर परिसर
• सोहळ्याचे भव्य व्यासपीठ
• ५० हजार व-हाडींची भोजन व्यवस्था
• ७९ जोडप्यांचा विवाह
परळी दि. २० : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची संपूर्ण जय्यत तयारी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार हे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तोतला मैदान परिसरातील बारा एकर जागेवर हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील ७९ जोडप्यांचा विवाह याठिकाणी सानंदात संपन्न होणार आहे.
शहरातील तोतला मैदानावर शुक्रवारी सायंकाळी ६.०५ वा. गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. दुष्काळात सापडलेल्या पालकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने हा सोहळा होत आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मनी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देवून ना. पंकजाताई मुंडे हया कन्यादान करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अक्षयकुमार हे सोहळ्यातील वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी परळीत येणार आहेत. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
*भव्य व्यासपीठ; शिस्तबद्ध यंत्रणा*
————————————
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यावर्षी पाऊस नसल्याने सर्व सामान्य माणूस दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे, अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी भाजपची शिस्तबद्ध यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत आहे. सोहळयासाठी १२०×६० आकाराचे मुख्य व भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्याच्या बाजूला आणखी तीन व्यासपीठ महत्वाच्या पाहूण्यांसाठी असणार आहेत. ५० हजार व-हाडी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून ६० क्विंटल गहू, १५ क्विंटल तांदूळ तसेच इतर साहित्य मागविण्यात आले आहे. १५ क्विंटलच्या मोतीचूर लाडूचा स्वाद देखील व-हाडींना मिळणार आहे.
७९ जोडप्यांचा विवाह
या सोहळ्यात हिंदू, बौध्द, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील ७९ जोडप्यांचा विवाह त्या त्या धर्मातील रिती रिवाजानुसार लावण्यात येणार आहेत. परळी मतदारसंघ तसेच बीड जिल्हयाच्या विविध दुष्काळग्रस्त भागातील वधू वरांनी यात नोंदणी केली होती. मागासवर्गीय समाजातील वर वधूंना संसारोपयोगी साहित्यासाठी २० हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य देखील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान शाहनाकडून मिळवून देणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.