केज दि.०५:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यात दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवून आले नसल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केल्या होत्या. प्राप्त तक्रारीपैकी काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने व पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमोल डाके यांनी पेरणी केलेल्या शेतीस प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली या वेळी महागुजरात सीड्स वरदान बायोटेक या दोन बियाणे कंपनीचे जेएस-३३५, एस-२२८, एमएनएस-७१ या वाणासह इतर वाणाच्या बियाण्यांची उगवण क्षमता ही ५ ते ४० टक्केच असल्याचे आढळून आले.
महागुजरात प्रा. लि. नागपूर व वरदान बायोटेक प्रा.लि. उज्जैन (मध्य प्रदेश) या कंपन्यांनी शेतकऱ्यांना निकृष्ठ दर्जाचे बियाणे पुरवल्याचे निष्पन्न झाले. कृषी अधिकारी अमोल डाकेंच्या फिर्यादीवरून वरदान कंपनीचे लोकेंद्र राजपूत, रश्मी राजपूत यांच्याविरुद्ध तर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांच्या फिर्यादीवरून महागुजरात कंपनीचे व्यवस्थापक अशोक नथुराम जोशी यांच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.