सोयगाव तालुक्यात पाचव्या कोरोना रुग्णाची नोंद ,पळसखेड्यात नवीन रुग्ण

जरंडी,ता.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणार्या पळसखेडा ता.सोयगाव येथील एकाला कोरोना सकारात्मक असल्याचा अहवाल रविवारी सोयगावला प्राप्त होताच खळबळ उडाली होती.तालुका प्रशासनाच्या आरोग्य आणि महसूलच्या पथकांनी तातडीने पळसखेडा गावात धाव घेवून उपाय योजनांसाठी गतिमान सूत्र हलविली आहे.
कोरोना संक्रमणाची संख्या सोयगाव तालुक्यात नियंत्रित असतांना जळगाव जिल्ह्यात तापेच्या उपचारासाठी जाणाऱ्या एका रुग्णाला कोरोना सकारात्मक असल्याचा अहवाल जळगावच्या खासगी वैद्यकीय सूत्रांनी रविवारी पाठविताच सोयगाव तालुका प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.पळसखेडा(ता.सोयगाव)येथील एकाला चार दिवसापासून तापेची लागण झाली असतांना त्याला उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,दरम्यान खासगी रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या कोरोना स्वॅबचे नमुने सकारात्मक आल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयाने तातडीने अहवाल जळगाव सामान्य रुग्णालयाला दिला होता.जळगाव सामान्य रुग्णालयाने हा अहवाल औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णाचा असल्याने सोयगावला अहवाल पाठविला त्यामुळे सोयगाव तालुका प्रशासनाने अहवाल मिळताच तातडीने पळसखेडा गावात धाव घेवून या सकारात्मक रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना संस्थात्मक कोरोटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.पळसखेडा ता.सोयगाव गावाला तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार शेख मकसूद,विठ्ठल जाधव यांनी तातडीने भेट देवून रुग्णाची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली.दरम्यान पळसखेडा गावात एका प्रभागातील ६१ ग्रामस्थांच्या २१ घरांना कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे या प्रभागातील ग्रामस्थांना आता घरातच राहावे लागणार आहे.
(सोयगाव तालुक्यावर कोरोना संकट ,अधिकारी मात्र सुटीसाठी औरंगाबादेत)
सोयगाव तालुक्यावर कोरोनाचे नवीन संकट कोसळले असतांना शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसाच्या सुटीसाठी मात्र प्रशासनाच्या यंत्रणांचे अधिकारी सुटीवर असून आरोग्य,आणि महसूल हि दोनच विभाग कोरोना संसर्गाशी लढा देत आहे.शासनाने रेड झोन मधून ये-जा करण्याबाबत अनेकदा अध्यादेश काढूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे औरंगाबादेतून ये-जा सुरूच असून याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देवूनही अद्यापही कारवाई गुलदस्त्यात आहे.मात्र अधिकाऱ्यांच्या ये-जा मुळे सोयगाव तालुका कोरोना संसार्गासाठी दोन दिवसापासून वाऱ्यावर सोडण्यात आलेला असून आरोग्य विभाग एकाकी कोरोनाशी झुंज देत असल्याचे पहावयास मिळत आहे.तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या नेतुर्त्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे,जरंडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार,आदींसह तालुका आरोग्य पथक कोरोनाशी दोन हात करतांना आढळून येत असून इतर यंत्रणा मात्र सुटीचे दिवस घालविण्यासाठी मात्र औरंगाबादेत बसून आहे.त्यामुळे सोयगाव तालुका वाऱ्यावर आहे.
————————–