अकोला: पोहण्यासाठी गेलेल्या २ बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना

तेल्हारा: रोहित वानखडे व देवा वानखडे हे दोघे शनिवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास गावालगतच्या एका शेतात असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. रात्री उशीरापर्यंत ते घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. यावेळी दोन्ही बालकांचे कपडे व चपला शेततळ्याच्या काठावर आढळून आली होती. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली.
पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्या ची घटना तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे घडली.
रोहित विनोद वानखडे १२ वर्षे आणि देवा गजानन वानखडे ११ वर्षे अशी या बालकांची नावे आहेत.
पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तळ्यात बालकांचा शोध घेतला; परंतु त्यांना यश आले नाही. बालकांचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील आपात्कालीन बचाव पथकासही पाचारण करण्यात आले होते. अखेर रविवारी दुपारी दोन्ही बालकांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी सायंकाळी बुडालेल्या या दोन बालकांचे मृतदेह रविवारी दुपारी काढण्यात आले.
ठाणेदार विकास देवरे व नायब तहसिलदार सुरळकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.