सोयगाव तालुक्यात हंगामीपूर्व पेरण्यांना प्रारंभ ,ठिबक सिंचनवर कपाशीची उन्हाळी लागवड

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शासनाचे यंदाच्या खरिपाच्या हंगाम२०२०-२१ साठी पिककर्जाचे उद्दिष्ट ठरेना आणि नियमित कर्जभरणा केलेल्या शेतकऱ्यांना बँका कर्ज देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भटकंती करायला लावतांना अशा स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस व्याजाची रक्कम काढून खरिपाच्या पूर्व हंगामी पेरण्यांना सोयगाव तालुक्यात रविवारपासून प्रारंभ केला आहे.खरिपाच्या हंगामाच्या पेरण्यांचा पहिला दिवसाचा मुहूर्त अखेर दि.३१ मे काढला असून शेतकऱ्यांनी कपाशी पिकांची उन्हाळी लागवडीची हालचाल हाती घेतली आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला आहे.
मराठवाड्यात ठिबक सिंचनवर कपाशी लागवडीसाठी अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात यंदाच्या हंगामातील पहिल्या पेरण्यांना सुरुवात झालेली आहे.त्यामुळे मजुरांची मोठी रेलचेल रविवारी सोयगाव तालुक्यात पहावयास मिळाली होती.यंदाच्या पूर्वहंगामी लागवडीसाठी पहिले बीज रोवण्याचा मान घोसला ता.सोयगाव गावाला मिळाला आहे.घोसला गावापासून या खरिपाच्या उन्हाळी पेरण्यांना प्रारंभ करण्यात आला आहे.एकीकडे कोविड-१९ च्या संसर्गाच्या विळख्यात अडकलेल्या मजूर आणि शेतकऱ्यांना तब्बल ६२ दिवस घरातच बसून राहावे लागले होते,सोयगाव तालुक्यात खरीप हंगामात हंगामी पूर्व कपाशी पिकांची लागवड करण्याचा मुहूर्त दरवर्षी दि.१५ मे पासून प्रारंभ करण्यात येतो परंतु यंदाच्या हंगामात शासनाने गुलाबी बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या धास्तीने आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत विलंब केला होता.(दि.२५)मे पासून शेतकऱ्यांना कपाशीसह सर्वच खरिपाच्या पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिल्याच्या घोषनेनंतर शेतकऱ्यांना बँकांकडून पिककर्जासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र होते,त्यामुळे बँकांच्या कागदपत्रांच्या वैतागला कंटाळून अखेरीस शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम काढून हंगामी पूर्व कपाशी लागवडीला प्रारंभ केला आहे.सोयगाव तालुक्यात ४३००० हेक्टर इतके क्षेत्र खरिपाच्या लागवडी योग्य क्षेत्र आहे.त्यापैकी २८७४३ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड करण्यात येते,परंतु खरीप पूर्व हंगामी लागवडीसाठी तब्बल १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवडी क्षेत्र असून त्यापैकी १०७४३ हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू कपाशीची लागवड करण्यात येते,हंगामी पूर्व क्षेत्रावर पहिल्या टप्प्यात ठिबक सिंचनवर कपाशी लागवडीच्या कामांना रविवार पासून वेग आला आहे.सोयगाव तालुक्यात तीस हजार शेतकरी कपाशी उत्पादक आहेत.मराठवाड्यात कपाशीच्या उत्पन्नात सोयगाव तालुका सलग पंधरा वर्षापासून अग्रेसर आहे.
—————————-
उन्हाच्या तापमानात मजुरांची लाही लाही-
हंगामी पूर्व कपाशी लागवडीचा मुहूर्त सोयगाव तालुक्यात निघाला असून रविवारी पहाटे ९ वाजता कपाशीच्या पहिल्या बियाण्यांची घोसला शिवारात लागवड करण्यात आली आहे.उन्हाच्या वाढत्या तापमानात मजुरांनी मात्र जीवाची पर्वा न करता कपाशीच्या लागवडीच्या कामांची लगभग केली होती.
—————————–
कपाशीचे बियाणे लावताच ठिबक सिंचनवरून पाणी-
पहिल्या टप्प्यात शेतात कपाशीच्या बियाण्यांची लागवड करताच ठिबक सिंचनद्वारे पाणी सोडण्यात आल्याने ठिबकच्या पाण्याने आणि वाढत्या उष्णतेने बियाणे मातीतच जळू नये यासाठी हा नवीन प्रयोग सोयगाव तालुक्यात अमलात आणला होता.
——————————
वाढत्या तापमानाने मजुरांना पारगी रोजंदारी-
सोयगाव तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेची वाढती झळ लक्षात घेता पहिल्याच दिवशी कपाशी लागवडीला मजुरांना पारगी रोजंदारीने मजुरी देण्यात आली असून पारगाला २०० रु याप्रमाणे पहिल्याच दिवशी मजुरांची रोजंदारी ठरविण्यात आली असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर वाघ,दिगंबर युवरे यांनी सांगितली.
————————-
शेतकर्याची पहिली प्रतिक्रिया-
कोरोना संसर्गामुळे रब्बीच्या उत्पन्नाची विक्रीची समस्या उद्भवली असतांना त्यातच नव्याने टोळधाडच्या संकटाची चिंता लागलेली आहे.त्यामुळे यंदाच्या हंगामाला तरी निसर्गाची दृष्ट लागू नये अशी अपेक्षा आहे.अशी पहिली प्रतिक्रिया घोसला येथील पहिले कपाशी लागवडीचे मानकरी ठरलेले शेतकरी दिगंबर युवरे यांनी दिली आहे.