परळी: शौचालयाच्या टाकीचे काम करत असताना गुदमरून दोघांचा मृत्यू, तर तिघेजण गंभीर असल्याने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना परळीच्या शिवाजीनगर भागात रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
उड्डाणपुलाच्या बाजूस असलेल्या शिवाजीनगर भागातील माणिक बाबुराव पोपळघट यांच्या घरी शौचालयाचे काम करत असताना गुदमरून परळीच्या साठे नगर भागातील दोघा जणांचा मृत्यू झाला असून इतर तिघांवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री बाराच्या सुमारास शौचालयाचे टाकी उपसण्याचे काम हे मजूर करत होते अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेत अर्जुन रमेश भालेराव (वय 20), विशाल शिवाजी लांडगे (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे तर कार्तिक भीमा कांबळे, शिवाजी यादव लांडगे, विशाल रमेश भालेराव यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0