बीडमधून डाॅ.प्रितम मुंडे यांचा विजय निश्चित ; मुंडे भगिनींची राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड

१६ व्या फेरी अखेर ७० हजार मतांनी आघाडीवर

परळीत ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड दि. २३:आठवडा विशेष टीम लोकसभेच्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु असून देशभरात भाजप अभूतपूर्व आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातही खा. प्रीतामताई मुंडे या १६ व्या फेरीअखेर ७० हजार मतांनी आघाडीवर होत्या. मतमोजणीचा ट्रेंड पाहता खा. प्रीतमताई यांच्या विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याने कार्यकर्त्यांचा ‘यशश्री निवासस्थानी प्रचंड जल्लोष सुरु आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांनी देखील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आणि जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले.

बीडची निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. खा. प्रीतमताई मुंडे या स्वकर्तुत्वावर प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या. प्रत्येक सभातून त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतानाच भविष्यातील विकासकामांचा आराखडा देखील जनतेसमोर ठेऊन आश्वासित केले. ना. पंकजाताईंनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाचे वाभाडे काढत त्यांची पोलखोल केली. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विकासाबाबत कुठलेही भाष्य न करता केवळ मुंडे भगिनींना दुषणे देण्यात धन्यता मांडली अतिशय खालची पातळीवर जाऊन मुंडे भगिनीं टीका करण्यात आली. याची चीड जनतेच्या मनात होती, तीच मतदानातून दिसून आली. मुंडे भगिनींनी विरोधकांच्या टोळीला जबरदस्त धोबीपछाड दिली असून १६ व्या फेरीपर्यंतच खा. प्रीतमताई ७० हजाराची आघाडी घेऊन विजयाच्या नजीक गेल्या आहेत.सकाळपासून निकालाकडे लक्ष लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना ताईंच्या विजय जवळ आल्याचा अंदाज येताच त्यांनी यशश्री निवासस्थनाकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे वाजत गाजत आणि फटक्यांची आतिषबाजी करत यशश्री निवासस्थानाकडे येत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून मुंडे भगिनींनी त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. दरम्यान, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांना आघाडी मिळताच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी पंकजाताई व प्रीतमताई यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. यावेळी मुंडे साहेबांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.

मुंडे साहेबांचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश

यावेळी माध्यमांसमोर बोलताना पंकजाताईंनी जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा विकासाचा वारसा भविष्यातही चालू ठेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाची कास धरली. खा. प्रीतमताई मुंडे यांच्या विकास कामांना जनतेने कौल दिला. त्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीने पंकजाताई भावूक

आज विजयाच्या वाटेवर असताना ना. पंकजाताई मुंडे साहेबांच्या आठवणीने भावूक झाल्या. सकाळी त्यांनी स्वतःचा व प्रितमताई यांचा बालपणीचा मुंडे साहेबांना फोनवर बोलतानाचा फोटो ट्विट केला होता. माझे बाबा तथा माझे नेते मुंडे साहेब यांची याप्रसंगी खूप आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे यश त्यांचेशी शेअर करता येत नाही पण आज त्यांना आमचे नक्कीच कौतुक वाटले असते आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजाताईंनी दिली.


विनायक मेटे आता खरच होतील का मंत्री ?

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

बीड दि.११: नुकताच आज लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मदतीने विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतलेले विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.त्यांच्या ह्या पाठिंब्यामागे नेमके काय राजकारण आहे? मेटे आता मंत्री तरी होतील का ? असे प्रश्न सामान्य जनतेच्या समोर येत आहे.विनायक मेटे यांनी ऐन निवडणूकीच्या काळात दिलेला पाठिंबा खरच सोनवणे यांना विजयापर्यंत घेऊन जाईल का ? असे कित्येक प्रश्न आज बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.

विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे.मेटे यांनी याआधीही बऱ्याच वेळेस पंकजा मुंडे यांना वेगवेगळ्या राजकीय मार्गानी विरोध दर्शविला होता.पण त्याचे राजकिय परिणामही त्यांना तसेच भोगावे लागले आहेत हे देखील सर्वांच्या समोरच आहे.आजच्या पाठिंब्यामुळे भविष्यात जर भाजपाची सत्ता आली तर मेटेच्या मंत्री पदावर शिक्का मोर्तब होईल,का भाजप त्यांना धक्का देत त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह आणेल?

बीड लोकसभा मतदारसंघात बीड तालुक्यापुरत पाहिलं तर पंकजा मुंडे गटापेक्षा मेटे यांच्याकडे राजकीय पावर कमीच आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी चे उमेदवार निवडून येतील याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही.नुकताच राष्ट्रवादीचे आमदार असलेले जयदत्त क्षिरसागर यांनी आपली सर्व ताकद पंकजा मुंडे गटाच्या उमेदवार डॉ प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी पणाला लावली आहे.त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. मुख्यमंत्री मेटेंच्या निर्णयाला गांभीर्याने घेतील का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

दरम्यान,२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेटेंचा बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी पराभव केला होता. यानंतर भाजपने मेटेंचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेवर नेलेलं होतं. पण आपल्याला मंत्रीपद मिळायलाच हवं यावर विनायक मेटे ठाम होते.परंतु ते त्यांना मिळवणे शक्य झाले नाही.

बजरंग सोनवणे आठ कोटी रुपयांच्या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करा―भिमराव धोंडे

आपले ठेवायचे झाकून लोकांचे पहायचे वाकून हे थांबवा

धानोरा-फुंडी-पिंपळगाव दाणी-विहीरा-घोंगडेवाडी रस्त्याचे काम कोणाचे पाप?

शिरुर दि.०२: लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्र्यावर आरोप करताना विचार करावा.आष्टी तालुक्यातील ज्या आठ कोटी रुपयांचे टेंडर बजरंग सोनवणे यांना मिळाले होते त्या रस्त्याची अवस्था पहा.रस्त्याचे काम अर्धवट ठेवून बोगस बिले उचलण्याचे काम केले आहे.त्यांना सत्ताधारी लोकांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असा टोला आमदार भिमराव धोंडे यांनी मानूर येथील कॉर्नर बैठकीत लगावला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,बजरंग सोनवणे ज्या कारखान्याच्या विषयावर बोलून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वर निशाणा साधत आहे,ते पूर्ण चुकीचे आहे.सोनवणे यांचा कारखाना नवीन असल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर त्याला सवलती मिळत आहेत.ज्या कारखान्याला अजून दहा वर्षे पूर्ण झाली नाही तो कारखाना चालविणारांनी ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडविणाऱ्यांवर बेताल आरोप करू नयेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील ज्या सात-आठ गावांना रस्ता करण्याचे टेंडर घेतले होते.ते काम जाऊन पहा म्हणजे लक्षात येईल.अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून बजरंग सोनवणे यांचे आरोप म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असला प्रकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सुंस्कृत आणि अभ्यासू खासदार प्रितमताई यांना त्यांच्या संकल्पनेतील भविष्यात होणारे विमानतळ पूर्ण करण्यासाठी मत द्यायचे असल्याचे त्यांनी आवाहन केले.रामकृष्ण बांगर यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की,दुसऱ्याला खोटे ठरविणारे हे स्वताच खोटे बोलत असून अगोदर त्यांनी स्वताच्या पाटोद्यात काय विकास केला ते सांगावे. तालुक्यातील अनेक गावांत भिमराव धोंडे यांनी भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या प्रचारानिमित्त कॉर्नर बैठका आणि नागरिकांना भेटून त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

सामान्य शेतकर्‍याच्या मुलाला खासदार करून भावनिक राजकारण करणार्‍यांना पराभूत करा―ना.धनंजय मुंडे

  • अन्याय विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम प्रामाणिकपणे करणार-माजी आ.पृथ्वीराज साठे

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत कॉर्नर बैठक

अंबाजोगाई (प्रतिनिधी): ही लोकसभेची निवडणूक श्रीमंत विरूद्ध सामान्य शेतकर्‍याचा मुलगा अशी होत असून देशासमोर आज अनेक प्रश्न आहेत.पाच वर्षापुर्वी लोकांची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या भाजपाच्या राजवटीला लोक कंटाळले आहेत. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्य घटना बदलण्याचा घाट विद्यमान सत्ताधारी यांनी घातला आहे. त्यामुळे देशाची घटना वाचविण्याचे मोठे आवाहन भारतीय जनते समोर आहे.कदाचित देशातील ही शेवटची निवडणूक असले कारण भाजप सत्तेत आल्यास पुन्हा निवडणूका होणार नाहीत असे भाजपाचेच नेते जाहिरपणे बोलत आहेत. बजरंगबप्पा सोनवणे हे तगडे उमेदवार असून साखर कारखान्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात त्यांनी ऊसाला सर्वाधिक भाव दिला आहे.याउलट वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी करणार्‍या व भावनिक राजकारण करणार्‍या भाजपाच्या नेत्यांना पराभूत करा असे अवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केले.तर यावेळी बोलताना आपण स्थापने पासून म्हणजे 1999 पासुन राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणुन काम करीत आहोत.पक्षाचा आदेश माणून व पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी यापुढेही काम करत राहू गेल्या सात वर्षात पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसापर्यंत पोहोंचवली.परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांना जाणवली. कार्यकर्ते मला प्रश्न विचारत आहे.मी कार्यकर्त्याला काय उत्तर देवू असा प्रश्न उपस्थित करून अन्याय विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी सांगितले.

अंबाजोगाई येथील प्रशांतनगर भागात माजी आ.पृथ्वीराज साठे व नगरसेवक बबनभैय्या लोमटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपाइं गवई गट,रिपाइं कवाडे गट, रिपाइं एेक्यवादी, मानवी हक्क अभियान आणि युवा स्वाभिमानी पक्ष यांचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्राचारार्थ गुरूवार,दि.28 मार्च रोजी मतदार संपर्क अभियान व जाहिर सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे, माजी आ.पृथ्वीराज साठे,जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील,नगरसेवक बबनभैय्या लोमटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,माजी जि.प.सदस्य राजपाल लोमटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे,अमर देशमुख, राजेश्वर चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेसाहेब औताडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे, नगरसेवक अशोक मोदी,नगरसेवक शेख रहिम,नगरसेवक अनिस अन्सारी,नगरसेवक इस्माईल गवळी, नगरसेवक सय्यद असदभाई,नगरसेवक शमशोद्दीन काझी,नगरसेवक मिलींद बाबजे,बाळासाहेब सोनवणे,बालासाहेब देशमुख,माजी उपनगराध्यक्ष शेख नबी,माजी नगरसेवक गौतम सरवदे,विष्णु चाटे,शेख रौफ,रवीकिरण देशमुख, प्रविण देशमुख, बन्सीअण्णा जोगदंड, अंजलीताई पाटील, सविता मेंढके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उल्हास पांडे,माजी जि.प.सदस्य अशोक उगले,दत्ता सरवदे
बालाप्रसाद बजाज, मुबीन देशमुख,अतहर जाहगीरदार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे, नगरसवेक बबनराव लोमटे,राजेश्वर चव्हाण, बन्सीअण्णा जोगदंड आदींची यावेळी भाषणे झाली. या प्रसंगी माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी बजरंगबप्पांना विजयी करण्यासाठी आपण गावोगावी जावून प्रचार करीत आहोत. अंबाजोगाई तालुक्यातून मताधिक्यदेवू पवार साहेबांचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोंचवू असे साठे यांनी सांगितले तर यावेळी ना.मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासीत करत माझे व माजी आ.पृथ्वीराज साठे यांचे नाते हे राजकारणाच्या पलीकडचे आहे.ते मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे यापुर्वी काही चुका झाल्या असतील तर त्याची जबाबदारी मी घेतो व आपणास शब्द देतो की जोपर्यंत राजकारणात धनंजय मुंडेंचा मानसन्मान आहे तोपर्यंत साठे साहेबांचा मान सन्मान कायम राहिल साठे साहेबांच्या राजकिय भवितव्याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये गट तट ठेवू नयेत सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.प्रचार सभेचे सुत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमर देशमुख यांनी करून उपस्थितांचे आभार शेख जावेद शेख खलील यांनी मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेस मोठ्या संख्येने महिला,युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.यावेळी जनतेने एकच निर्धार केला असून शेतकर्‍याच्या मुलाला खासदार करण्यासाठी ग्रामिण भागातून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हेच अंबाजोगाई येथील प्रचार सभेतून दिसून आले.