#WorldNursesDay जागतिक परिचारिका दिन विशेष लेख

स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या व्यवसायिक जीवनातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच 12 मे जागतिक परिचारिका दिन.
12 मे 1820 रोजी मिस.फ्लॉरेन्स नाईटींगेल यांचा जन्म झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रुग्ण सेवेला सुरुवात झाली.त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हातात दिवा घेऊन जखमी सैन्याची सुश्रूषा केली म्हणून त्यांना Lady with the Lamp असे संबोधले जाते कालांतराने त्यांनी 1860 साली लंडनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना केली त्यामुळेच आज संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी नर्सिंग स्कूल स्थापन होऊन त्यातून प्रशिक्षित परिचारिका बाहेर पडत असून त्या चांगल्या प्रकारे रुग्णसेवा करत आहे म्हणूनच आज संपूर्ण जगात आरोग्य क्षेत्रात परिचारिकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सद्यपरिस्थितीत परिचर्या मध्ये झालेला व होत असलेला अमुलाग्र बदल याचा पाया खऱ्या अर्थाने मिस.फ्लॉरेन्स नाईटींगेल यांनी घातला म्हणून त्यांना जागतिक स्तरावर आधुनिक परिचर्येची जननी असे संबोधतात म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो परंतु यावर्षी त्यांचा जन्मदिवसास दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने 2020 वर्ष परिचारिकांना समर्पित करून परिचारिकांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे.
आज आरोग्य क्षेत्रात परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा बनलेल्या आहेत एका बाजूला एक प्रशिक्षित परिचारिका म्हणून सामाजिक बांधिलकी व रुग्णांना केंद्रबिंदू मानून त्यांना दिलेल्या समस्येमध्ये सुखी समाधानी आहेत परंतु दुसऱ्या बाजूला सुख-समाधान हून अधिक परिचारिका उपेक्षितच आहेत खर्‍या अर्थाने रुग्णसेवा कोण करते असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर निश्चितपणे परिचारिका असायला हवे कारण 24 तास रुग्ण सोबत राहून त्यांची सेवा करून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम परिचारिकाच करतात त्यांना तमा नसते वेळेची, न परवा असते स्वतःच्या सुखदुःखाची वैयक्तिक अपेक्षा कडे दुर्लक्ष करत अहोरात्र रुग्णसेवेत गुंतलेले असतात.
बदलत्या काळानुसार गेल्या काही वर्षात सामाजिक व कौटुंबिक बदलामुळे तसेच आजाराचे बदलते स्वरूप व वाढती लोकसंख्या यामुळे रुग्णालयांची व त्याचबरोबर परिचारिकांची गरज फार मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे .परिचारिकांची संख्या ही त्यांच्या मागणी पेक्षा खूपच कमी आहे आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग व महानगर पालिकेचे रुग्णालय येथील रुग्णसेवेचा डोलारा हा अतिशय अल्प प्रमाणात असलेल्या परिचारिकांच्या खांद्यावर आहे त्यामुळे सद्यपरिस्थितीत कामावर असणाऱ्या परिचारिका वरती त्याचा ताण पडत आहे त्यामुळे भारतीय परिचर्या परिषदेने ठरवून दिलेल्या रुग्ण परिचारिका गुणोत्तर कधी पूर्ण होईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात अप्रशिक्षित व अनोंदनीकृत परिचारिकांचा सुळसुळाट आहे आपल्याकडे प्रशिक्षित परिचारिका असतानासुद्धा अशा अप्रशिक्षित व्यक्तींकडून रुग्णसेवा करून घेतली जाते ते कशाप्रकारे रुग्णसेवा करतात हा सुद्धा एक प्रश्नच आहे अशा व्यक्तीमुळे प्रशिक्षित परिचारिकांचा दर्जा समाजापर्यंत पोहोचत नाही ही एक खेदाची बाब आहे त्याच बरोबर या प्रशिक्षित परिचारिका खाजगी रुग्णालयात रुग्णसेवा करतात त्यांना अद्याप किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही याउलट अप्रशिक्षित व अनोंदणीकृत व्यक्तींना जास्त वेतन दिले जाते हे हे परिचारिकांचे दुर्भाग्य आहे असे मी मानतो. परिचारिकांनी रुग्णसेवा चांगल्याप्रकारे करून सुद्धा आजवर समाजाकडून हवा तसा मानसन्मान त्यांना मिळाला नाही याशिवाय कामाच्या ठिकाणी त्यांना अनेकांकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . समाजामध्ये शुश्रुषा ला खूप मानाचे स्थान आहे पण इतर ठिकाणी जर आपण पाहिलात मग ते साहित्य नाटक किंवा सिनेमा असेल यामध्ये परिचारिकांची प्रतिमा फारशी चांगली रंगवली जात नाही यासाठी कुठेतरी परिचर्या व्यवसायाबद्दल असा सामाजिक दृष्टिकोन बदलणे अपेक्षित आहे.

आज संपूर्ण जगासमोर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे संकट उभे असताना संपूर्ण जगभरात परिचारिका वैश्विक महामारीच्या युद्धामध्ये आपले घर – संसार ,लहान मुले हे सर्व सोडून कोरोनाला हरवण्यासाठी अगदी योद्ध्यासारखे सारख्या लढत आहेत आणि आपला वेगळा ठसा जगभर उमटविण्याचे काम करत आहेत.
विशेषतः हे वर्ष परिचारिकांचे वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे आणि या कालावधीमध्ये परिचारिका आणि परिचर्या व्यवसायाला व्यवसायाला जो मान सन्मान मिळत आहे यावरून समाजाची ही बदललेली भावना परिचारिकांना नक्कीच ऊर्जा व बळ देणारी सकारात्मक बाब आहे परंतु ही भावना केवळ या कालावधी पुरतीच न राहता पुढील कालावधीमध्ये सुद्धा सदैव परिचारिका आणि परिचर्या व्यवसायाविषयी समाजाची भावना अशीच सकारात्मक राहील अशी अपेक्षा करतो.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आपल्याकडून पुढील काळात उत्कृष्ट कार्याची अपेक्षा करतो.
धन्यवाद.

― श्रीधर भांगे
पाठ्यनिर्देशक
शासकीय नर्सिंग स्कूल, बाभळगाव, लातूर

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.