अंबाजोगाई तालुकाकार्यक्रम

शिवरायांचे विचार आत्मसात करुन जगावर राज्य करा-राजेसाहेब देशमुख

कुंबेफळ येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव

अंबाजोगाई (प्रतिनिधी) आजचा काळ हा तलवारीने नव्हे तर लेखणीने कर्तबगारी गाजविण्याचा आहे. तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी,युवकांनी लेखणी व पुस्तक यांचा वापर करुन आपले मन,मेंदू,मनगट व मस्तक बळकट करावे, विज्ञानवाद जोपासावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे.थोरा-मोठ्यांचे विचार अंगिकारावेत. आज आणि उद्याही श्रमाला प्रतिष्ठा मिळणार आहे.तेव्हा उद्योगी बना,सतत कार्यमग्न रहा.स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळून,कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून उर्वरित वेळेत समाजाची सेवा करा.आई-वडिलांचा सांभाळ करा, गुरुजनांचा आदर करा. शिवरायांचे विचार आत्मसात करुन जगावर राज्य करा असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले.ते तालुक्यातील कुंबेफळ येथे आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव कदरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती राजेसाहेब देशमुख यावेळी विचारमंचावर आविनाश मोरे,डिवरे सर, राधाकृष्ण लड्डा, सुर्यभान लुगडे,विनोद पाटील,माजी सरपंच कसबे,माजी सरपंच सुलेमानभाई,हनुमंत पाटील,सार्वजनिक शिवजयंती उत्सव कुंबेफळचे अध्यक्ष ओम यादव,संजय भोसले, रवी पाटील,अविनाश भोसले,शशिकांत झिरमाळे,नवनाथ भोसले,मनोज भोसले, संतोष शिंदे,अरुण भोसले आदिंची प्रमुख उपस्थिती होती.तर या कार्यक्रमासाठी कुंबेफळ येथील ग्रामस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कुंबेफळ येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे प्रतिमापुजन करण्यात आले.या ठिकाणी ग्रामस्थांनी आकर्षक मेघडंबरी,चौक सुशोभिकरण केले होते. फुलांच्या माळा,भगव्या पताकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.दरवर्षी कुंबेफळ येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व विविध उपक्रम,व्याख्यान आयोजित करून साजरा करण्यात येतो. शिवजन्मोत्सवाच्या यशस्वितेसाठी कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.