ऑनलाईन संवादात शिक्षक प्रतिनिधींनी केला सरकारच्या ऑफलाईन बदल्यांना तीव्र विरोध

Last Updated by संपादक

पंकजाताई मुंडे यांनी मराठवाडयातील शिक्षकांना दिले बळ

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच हव्यात ; सरकारला जाब विचारण्यासाठी तयार रहा

बीड दि.२४:आठवडा विशेष टीम―
कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व शाळा सध्या बंद आहेत, शिवाय सरकार सर्व व्यवहार ऑनलाईन करत आहे, मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईनच का ? हा घाट कुणासाठी घातला जातोय असा थेट सवाल करत याचा जाब विचारण्यासाठी तयार रहा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आज मराठवाडयातील शिक्षकांशी संवाद साधताना केले. सरकारच्या ऑफलाईन बदलीच्या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या तमाम शिक्षकांना या आवाहनामुळे बळ मिळाले आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना घेतलेल्या ऑनलाईन बदली धोरणाचे स्वागत करून उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी सरकारच्या ऑफलाईन धोरणाचा या संवादात तीव्र विरोध केला.

मराठवाडा शैक्षणिक विकास परिषदेचे अध्यक्ष तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे यांच्या पुढाकाराने मराठवाडयातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व लोक प्रतिनिधी यांच्याशी पंकजाताई मुंडे यांनी आज ऑनलाईन संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. सुरेश धस, आ. तानाजी मुटकूळे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. सौतोष दानवे, आ. मेघनाताई बोर्डीकर हे मराठवाडयातील आमदार तसेच
माजी आमदार गोविंदराव केंद्रे, देविदास राठोड हे सहभागी झाले होते.

शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडविण्याचे काम ते करतात,त्यामुळं त्यांना मनासारख्या नेमणूका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे असे त्या म्हणाल्या. आम्ही सरकारमध्ये असताना सचिव, सर्व संबंधित अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी या सर्वाना विश्वासात घेऊन ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला होता.ज्यामुळे सर्व सामान्य शिक्षक, ज्यांना कुणी वाली नव्हत, ज्यांचा कुठला वशीला नव्हता अशांना भ्रष्टाचारमुक्त धोरणाचा लाभ झाला परंतू विद्यमान सरकारने मात्र ऑफलाईनचा निर्णय कशासाठी घेतलाय ? असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय हास्यापद असून ‘खाली डोकं वर पाय’ असा आहे असे त्या म्हणाल्या. बदल्या हया ऑनलाईनच असाव्यात अशी तमाम शिक्षकांची इच्छा आहे. त्यासाठी मी स्वतः आग्रही आहे. माझे आजोबा तसेच मामा प्रमोद महाजन हे तर स्वतः शिक्षक होते आणि गुरू म्हणून माझे पिता मुंडे साहेब हे ही याच वातावरणात वाढले, त्यामुळे या लढाईत मी तुमच्यासोबत आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदन दिली आहेत. सरकारने बैठक बोलवावी हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा हा निर्णय बदलण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागेल असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला.

शिक्षकांच्या विरोधाची धार तीव्र

या संवादात विकास गवते, मंगेश जैवाल, सुरेखा खेडकर, राहूल उंडाळे, श्रीराम बोचरे, शेख जलील, राजेंद्र लाड, अशोक बांगर, धसे, प्रताप देशमुख, अजित मगर, पुरूषोत्तम काळे, मदन मुंडे आदीसह सुमारे दिडशेहून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला.या सर्वानी सरकारच्या ऑफलाईन बदली धोरणाला कडाडून विरोध केला. हा निर्णय आर्थिक लोभासाठी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. या लढ्यात आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहोत असा विश्वासही त्यांनी दिला.
या संवादात सहभागी झालेल्या सर्वाचे राम कुलकर्णी यांनी आभार मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.