पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील चुंबळी या गावची रहिवाशी असलेली कु.पूजा पाटील पवळ हिची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात कृषी सहाय्यक पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्लक्षित असलेला हा पाटोदा तालुका,शेतीशिवाय दुसरा कोणताही मोठा उद्योग धंदा येथे उपलब्ध नाही.शिक्षण घ्यायचे म्हटले तर कोणतेही मोठे कॉलेज तालुक्यात उपलब्ध नाही.
परंतु येथील युवकांनी परिस्थिती समोर हार न मानता पाण्यावर अथवा शेतीवर अवलंबून न राहता स्पर्धा परीक्षेकडे वाटचाल सुरु केली आहे.प्रतिकूल परिस्थिती वर मात करून स्पर्धा परीक्षेत घवघवीतपणे यशही संपादन केले आहे.त्यामुळेच अलीकडच्या काही वर्षांमध्ये या तालुक्याची ओळख निर्माण होऊ लागली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागात तालुक्यातील सुपुत्र कार्यरत असून आपल्या ‘धडाकेबाज’ कामगिरीने तालुक्यासह जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी झलकावत असल्याने अधिकाऱ्यांची खाण असलेला कारखाना अशी पाटोदा तालुक्याची ओळख संपूर्ण राज्यात होऊ लागली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी सहाय्यक पदाच्या यादीत तालुक्यातील चुंबळी गावातील पूजा ने तालुक्यातील यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
माजी सैनिक असलेले पाटील पवळ यांची ती कन्या.
पाटील यांनी भारत देशाची यशस्वीपणे सेवा पार पाडतानाच आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले आहे.त्यांचा एक मुलगा पोस्टल असिस्टंट या पदावर तर एक मुलगी लायब्ररी असिस्टंट या पदावर कार्यरत आहे.पूजा ही तिसरी मुलगी असून तिचे बीएससी ऍग्री हे शिक्षण कृषी विद्यापीठ परभणी येथे झालेले आहे.तिनेही आपल्या भावंडांच्या पावलावर पाऊल टाकत कृषी सहाय्यक पद मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे व तिच्या वडिलांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.