बीड: कोविड-१९ लढ्यात रुग्णालयातील खरेदीसाठी खर्चीत १५ कोटींची व रुग्णांची हेळसांड – डॉ गणेश ढवळे

Last Updated by संपादक

अनागोंदी कारभार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र कमिटी गठीत करून करण्याची मागणी

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निवारणासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. केवळ बीड जिल्हा शासकीय रूग्णालय व स्वाराती अंतर्गत इतर ठिकाणी रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयाच्या परिसरात 30 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यासाठी दिला आहे.विशेष म्हणजे औषधी खरेदी,कोरोना प्रादुर्भावावरील साहित्य, कोविड रूग्णालय सुरू करणे, वैद्यकीय साहित्य,साधन,यंत्र सामुग्री त्याचबरोबर पॉझिटिव्ह रूग्णांना श्‍वास घेण्यासाठी ऑक्सीजन प्लँट व पाईपलाईन. त्याचबरोबर विद्युतीकरण व इतर गोष्टीसाठी अंदाजे 15 कोटीच्याजवळ खर्च केला आहे. मात्र एवढा खर्च होऊनही लाईट गेली, व्हेन्टीलेटर बंद पडले आणि तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला.यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दुपारी उठून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी पत्रकबाजी केली.एवढेच नव्हे तर जिल्हा रूग्णालयात काय खरेदी केली,काय सुविधा पुरविल्या हे उघडपणे सांगण्यात डॉ.अशोक थोरात कमी का पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा खर्च कशावर झाला? केवळ कागदोपत्री दाखविल्या का? या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी व चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैद्यकीय कमिटी स्थापन करून जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून खर्च झालेल्या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी करत असताना राजकीय पुढार्‍यांनाही आवाहन केले आहे की पुढार्‍यांनो कोरोनाबाधित रूग्णांच्या संवेदना ओळखा डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालू नका अशी भावनात्मक हाक जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी अथवा या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी व शासनाकडून करोडो रूपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कशावर किती खर्च झाला याची माहिती पाहिली तर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जणू काही जिल्हा रूग्णालय बांधल्यापासून विद्युतीकरण झाले नाही असे भासवून विद्युतीकरणावर 52 लाख 81 हजार रूपये, ऑक्सीजन प्लँट,पाईनलाईन 5 कोटी 18 लाख 47 हजार रूपये,कोरोना वार्डातील अधिकारी,कर्मचारी निवारणीसाठी इमारतीचे विद्युतीकरण 3 लाख 19 हजार,प्रयोगशाळेची सुधारणा 28 लाख,जिल्हा शासकीय रूग्णालयातील अनेक वार्डचे कोविड कक्षात रूपांतरावर लाखो रूपयांचा खर्च केला आहे.त्यामुळे एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातांनी चालवलेला हा सावळा गोंधळ आणि रूग्णांची हेळसांड झालेली पाहता सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.कोट्यावधी रूपये खर्च करून पॉझिटिव्ह रूग्णांची हेळसांड होतेय कशी? विद्युतीकरणावर लाखो रूपये खर्च करून लाईट जाते कशी? रूग्णाचा तडफडून मृत्यू होतो कसा? ही जिल्ह्यासाठी आणि डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पुढार्‍यासह इतर जणांना रूग्णांची हेळसांड, रूग्णांचा मृत्यू यांच्या संवेदना दिसून येत नाहीत का? त्यामुळे अशोक थोरातांनी कोरोना संदर्भात जो खर्च दाखविला आहे त्या सर्व खर्चाची विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांनी चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लँट,पाईपलाईन, विद्युतीकरण यासह ज्या ठिकाणी खर्च दाखविला आहे त्याची चौकशी,तपासणी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणाहून एक कमिटी पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांना मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केलेल्या ईमेलद्वारे केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.