मुंबई:आठवडा विशेष टीम―नांदेड जिल्ह्यातील तालुका लोहा मु. माळेगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकां कडून आज विटंबना करण्यात आलेली आहे. या संतापजनक घटनेला जबाबदर असलेल्या दोषी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली आहे.
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा एक हात तोडून टाकण्याचा प्रयत्न समाजकंटका कडून करण्यात आलेला आहे. आंबेडकर पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या प्रकारामुळे आंबेडकरी जनता संतापली असून सरकार विरोधात पुतळ्या समोर येऊन त्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे. या संदर्भात नांदेड जिल्ह्याचे एसपी श्री विजयकुमार मगर आणि लोहा विभागाचे डीवायएसपी किशोर कांबळे यांचेशी दयाल बहादुरे यांनी संपर्क साधून
आरोपींना पोलिसांनी तात्काळ शोधून अटक करण्याची मागणी केली. नाही तर महाराष्ट्र भर सरकार च्या विरोधात आंदोलन पेटल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दयाल बहादुरे यांनी सरकारला दिलेला आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या सर्व पुतळ्याना सरकारने चोवीस तास पोलीस संरक्षण द्यावे व पुतळ्याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी दयाल बहादुरे यांनी केली आहे.
माळेगाव येथे घडलेल्या आंबेडकर पुतळा विटंबनेच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.