अंबाजोगाई दि.०८:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्यानजिक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी (दि.८ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागनाथ महादेव गायके (35), वसंत जनार्दन गायके (वय 45) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (23) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 13 बीडी 5684) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने (एमएच 25 यु 2444) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.लॉकडाऊनमध्येही वाळूची अवैध वाहतूक बिनघोरपणे सुरु आहे. लॉकडाऊन सुरु असतानाही वाळू माफिया मात्र कुठलेही निर्बंध पाळत नसल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा उघड झाले असले तरी कडक कारवाईची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.