Last Updated by संपादक
नवी दिल्ली दि.११ ऑगस्ट २०२०:वृत्तसंस्था― वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावर बऱ्याच ठिकाणी न्यायालयामार्फत लढा सुरू होता. पण, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला निर्णय देत मोहोर उमटवली आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
आपल्या वडिलांच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना आपल्या सख्या बंधू प्रमाणे समान वाटा मिळेल, असे २००५ मध्ये अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.आज न्यायमूर्ती मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच म्हणजेच आपल्या सख्या भावाप्रमाणे समान वाटा मिळाला पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा आपल्या आदेशात म्हणाले की, ‘प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीचं असते’ असे त्यांनी म्हटले आहे.
मुलीला १९५६ च्या कायद्यानुसार वाटा मिळणार होता. पण २००५ सालात केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात २००५ सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान वाटा मिळणार असा बदल करण्यात आला. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आता मुली हक्काने आपला वाटा मागू शकतील.