सोयगाव:दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सततच्या पावसापाठोपाठ आता बहारात आलेल्या खरिपाच्या हंगामावर तालुक्यात वन्यप्राण्यांनी ताव मारण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचा फुलावर आलेला जोमदार हंगामाचे पुन्हा नकसान होत आहे.त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे.
सोयगावसह तालुक्यात झालेल्या सततच्या पावसाने सर्वत्र हिरवळ पसरली आहे.त्यातच खरीपाचा हंगाम आता फुल पात्यावर येवून ठेपला आहे.शेंगांच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे मात्र अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांनी शेतात रात्रीचा धुडगूस घालून हंगाम उध्वस्त करण्याचा बेत आखला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.सोयगाव तालुक्यात तब्बल ४१७५८ हेक्टरवरील खरीपाचा हंगाम बहरला आहे.यामध्ये काही भागात ठिबक सिंचन वरील कपाशी पिकांना बोंडे लागली आहे.शेंगाचा हंगाम सुरु झालेला असतांना मात्र वन्य प्राण्यांनी रात्रीच्या सुमारास धुडगूस घालून या हंगामाचे नुकसान करण्याचा डाव आखल्या जात आहे.दोनच दिवसात सोयगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या धुडगूस मध्ये तब्बल दोन हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती बाधित शेतकऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीला मात्र तिलांजली देण्यात येत आहे.रात्रीच्या सुमारास रानडुक्करे,रोही आदींच्या पथकांचा थेट शेतात मुक्काम होत असतो रात्रभर हि टोळकी कपाशी,मका,चवळी,मुग,आदि पिकांची शेंडे तोडून फस्त करत आहे.सोयगाव तालुक्यात सध्या शेंगांचा हंगाम बहरला आहे.त्यामुळे शेंगांवर ताव मारायचा मोठा बेत या वन्यप्राण्याकडून आखल्या जात आहे.
पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकरी रात्रीचा शेतावर-
रात्रीच्या सुमारास वन्यप्राण्याकडून शेतात पिकांच्या नुकसानीच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना रात्रीचे शेतावर जावून सुरुंग व आवाज काढावे लागत आहे.या वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी रात्री शेतावर फटाक्यांची आतषबाजी करावी लागत आहे.त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी मात्र दुसर्या बाजूने आर्थिक झळ सोसावी लागत आहे.