जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देताच बीड बायपास रस्त्याचे दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु

Last Updated by संपादक

औरंगाबाद, दि.21:- वाहतुकीमुळे कोंडी होत असलेल्या बीड बायपास रस्त्यावरील कोंडी दूर करुन या रस्त्याची योग्य देखभाल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले. पालकमंत्र्यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष बीड बायपासवरील विविध ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. सदरील सूचना प्राप्त होताच या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ सुरू देखील केली आहेत.
पैठण रोड येथील कृषी विज्ञान केंद्रापासून झाल्टा फाट्यापर्यंत रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. बीड बायपास रस्त्यावर पटेल लॉन्स, हिवाळे लॉन्स, देवळाई चौक, शिदोरी हॉटेल आदी परिसरातील रस्त्याच्या एकतर्फी भाग पावसामुळे मोठ्याप्रमाणात खराब झाला आहे. सदर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी उजव्या व डाव्या बाजूला पाणी साचून आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे सपाटीकरण करून व्यवस्थित उतार देणे. आवश्यक पोलिस बंदोबस्त देण्याबाबत उपायुक्त राहुल खाडे यांना दूरध्वनीवरून निर्देश दिले. तसेच या रस्त्यावर मध्यभागी व बाजूला मोठ्याप्रमाणात खड्डे पडलेले आहेत व रस्ता खचलेला आहे. याबाबत तत्काळ योग्य प्रतीची साधनसामुग्री वापरून दुरूस्ती करावी. रस्त्यावरील पाणी साचून डबके तयार झालेले आहे, या पाण्याचा निचरा करण्यात यावा, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी केल्या.
*_झाल्टाच्या अँटीजेन युनिटला भेट_*
झाल्टा फाटा येथील रॅपिड अँटीजेन टेस्टिंग युनिटलाही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी भेट दिली. तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. जिल्हाधिकारी यांच्या भेटीच्या वेळेपर्यंत आज एकूण 67 अँटीजेन चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, असे यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या युनिटला काल काही समाजकंटकांनी व्यत्यय आणला होता. या घटनेचा प्रथम खबरी अहवाल झाला असून संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी वैयक्तिकरित्या सदर घटनेचा तपास करून, दोषींवर योग्यती कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी या भेटीदरम्यान संबंधितांना निर्देश दिले.
या भेटीप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, अतिरिक्त तहसीलदार किशोर देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एन. सूर्यवंशी, शाखा अभियंता सुनील कोळसे, करमाड टोलवेजचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.