सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पावसाचा बारावा दिवस आणि गायब झालेले सूर्यदर्शन यामुळे धोक्यात आलेल्या खरीपापाठोपाठ कपाशी पिकांना अति पावसामुळे अज्ञात रोगाची लागण झाली आहे.यामध्ये कपाशी पिकांवर या प्रादुर्भावाचे लक्षणे वेगळीच असून कपाशी पिके कोमेजत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सोयगाव तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी चाळीस दिवस आधीच ओलांडली आहे.सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मात्र कपाशी पिकांना माना टाकण्याची वेळ आली असतांना त्यातच शुक्रवार पासून नव्याने प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.गुरुवारी झालेल्या पावसाने अचानक कैऱ्यांना गळ लागल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी पहाटे अचानक कपाशी पिके कोमेजत असल्याचा प्रकार नव्याने आढळून आला आहे. सोयगाव तालुक्यात ३२ हजार हेक्टरच्या वर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली असून अज्ञात रोगाच्या विळख्यात २ हजार हेक्टर वरील पिके अडकली आहे.यामध्ये कोरडवाहू क्षेत्रात मोठी बाधित क्षेत्रात वाढ आहे.या रोगावर मात्र तालुका कृषी विभागालाही निदान सापडत नसल्याने शेतकऱ्यांना नियंत्रणासाठी कृषी सल्ले देण्यास कृषी विभागाकडून असमर्थता आढळून येत आहे.अति पावूस आणि गायब झालेल्या सूर्यप्रकाशामुळे हा प्रकार आढळत आहे.काही भागातील शेतात कपाशी पिकांची पाने सुकल्याचे दिसत असल्याने कपाशीच्या काड्या उभ्या आहे.या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामातील कपाशी पिके संकटात सापडली आहे.त्यामुळे दीपावली आधी कापसाच्या वेचण्या लांबण्याची शक्यता आहे.