जरंडी,ता.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडी ता.सोयगाव वीज उपकेंद्रातून घोसला फिडरद्वारे वीज पुरवठा करण्यात येणाऱ्या सात गावांना किरकोळ बिघाडामुळे गुरुवारी रात्रभर अंधारात राहावे लागले त्यामुळे गुरुवारी रात्री घोसला ता.सोयगाव येथील संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर आले होते.
ऐन गणेशोत्सवात जरंडी वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा करणाऱ्या घोसला फिडरद्वारे वीज पुरवठा करण्यात येत असतांना अचानक बिघाड झाल्याने या फिडर वरील कवली,तिखी,उमरविहीरे , निमखेडी, आणि घोसला या गावांना रात्रभर अंधारात राहावे लागले महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच बिघाड दूर करण्याची तसदी न घेतल्याने या सात गावात अंधार पसरला होता.त्यामुळे घोसला गावातील संतप्त ग्रामस्थांनी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणची प्रतीकात्मक होळी केली होती.शुक्रवारी पहाटे महावितरणचे पथक धडकले असता अवघ्या पाच मिनिटात बिघाड दूर झाला होता त्यामुळे या पाच मिनिटासाठी सात गावातील ग्रामस्थांना १५ तास विजेविना राहावे लागले.
मराठा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव सुरु होताच सोयगाव तालुक्याला गणेशोत्सव काळात अखंडित वीज द्या अशी मागणीचे पत्र सोपान गव्हांडे यांनी महावितरणच्या कन्नड अभियंत्यांना देवूनही या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तसदी घेतली नसल्याचा संताप ग्रामस्तांनी व्यक्त केला होता.