पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील ग्रामिण भागातील महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांचा सावळागोंधळ सुरू असुन छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गितेवाडी फाटापर्यत ७ कि.मी.अंतरासाठी केवळ एकच रोहित्र असुन गेल्या ३ वर्षांपासून अत्यंत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामिण भागांमध्ये लोंबकळणा-या विद्युत तारा, वाकलेले पोल, उघड्यावरील रोहित्र तसेच महावितरणच्या कर्मचा-याची अरेरावी यांना वैतागलेल्या सामाजिक कार्यकर्ते,तथा ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करून श्री. अंजनकर उपसहायक उपभियंता यांना निवेदन दिले.
लक्ष्मण सस्ते ,सामाजिक कार्यकर्ते ― छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गितेवाडी फाटा या ७ किमी अंतरावर केवळ एकच रोहित्र असुन यावर ३ पेट्रोलपंप, २० वेल्डींग मशिन, दोन बार, ५ खानावळी , १२ चहा हाटेल व्यावसायिक असुन अत्यंत कमी दाबाच्या विजपुरवठा यामुळे उद्योगधंदे बसले आहेत. याविषयी वारंवार तक्रारी करून सुद्धा महावितरण अधिकारी, कर्मचारी यांनी दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव बोंबाबोंब आंदोलन करावे लागले.
विजबिल माफी हवी,लोंबकळणा-या विद्युत तारा, उघड्यावरील रोहित्र,कर्मचा-यांची अरेरावी : डॉ.गणेश ढवळे
पाटोदा तालुक्यातील गावांतर्गत लोबकळणा-या विद्युत तारा, वाकलेले पोल, उघड्यावरील रोहित्र, जास्तीचे विजबिल ,रिडींग न घेताच अंदाजे रिडींग यामुळे ग्रामस्थ हैराण असुन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कृषिपंप व लघुउद्योग, सरसकट विजबिल माफ करण्यात यावे या मागणीचे निवेदन ऊर्जामंत्री नितिन राऊत, कृषिमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले असुन तात्काळ मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा महावितरणला दिला आहे.यावेळी महावितरण विरोधात बोंबाबोंब आंदोलनात लक्ष्मण सस्ते,डॉ. गणेश ढवळे, अक्षय पवार, धर्मवीर काळे, अर्जुन काळे सहभागी झाले होते.