उच्चशिक्षित तरुण पत्रकाराने व्यवसायातून निर्माण केला आदर्श ! ; नानासाहेब डिडूळ यांच्या ‘कुशन वर्क’ ची गुणवत्ता जिल्हाभरात

पाटोदा:आठवडा विशेष टीम― …आपल्या खडतर कष्ट, मेहनत, कार्यक्षमता आणि परिश्रमाच्या जोरावर पुस्तकी शिक्षणाबरोबरच छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायातून केवळ नोकरीच्या पाठीमागे लागलेल्या तरुण, बेरोजगार युवकांना आपला वेगळा आदर्श निर्माण करून देणाऱ्या उच्चशिक्षित पत्रकाराच्या प्रेरणेची पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरात चर्चा होत आहे !

पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील नानासाहेब मोतिराम डिडूळ हा तरुण. पिढ्यान पिढ्या रस्त्यावर ऊन पावसात पादत्राणे दूरूस्तीचा व्यवसाय करून उपजीविका करण्याची परंपरा ; परंतु नानासाहेब यांनी मात्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांच्या वाचनातून शिक्षणाचा वसा घेतला.. आणि प्राथमिक, माध्यमिक ते थेट बी.कॉम. एम.ए. एम. सी.जे. ही पत्रकारितेतील उच्च पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सन्मान मिळवला !

त्यानंतर त्यांनी समाज परिवर्तनाच्या या व्यापक सागरामध्ये उडी घेतली; लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेला प्रारंभ केला. पाच वर्षांपूर्वी विभागीय, जिल्हा दैनिकात आणि त्यानंतर सध्या ते एका साप्ताहिकाचे उपसंपादक तर एका चॅनलचे पाटोदा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत; परंतु या व्यवसायामध्ये होणारी पिळवणूक, आर्थिक बेकारी, अल्प मोबदला,मक्तेदारी यामुळे पूर्णवेळ काम करणे अशक्य झाले.

तेंव्हा नानासाहेब डिडूळ यांनी पाटोदा ते चुंबळी फाट्यावर ‘सद्गुरु लेदर अंँड कुशन’ हा व्यवसाय विश्वनाथ काळे, लखन गाडेकर यांच्या सहकार्याने उभारला…

हा उच्चशिक्षित तरुण कसलीही लाज न बाळगता अत्यंत कुशलपणे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या सीट कव्हर, आदीसह ट्रॅक्टरचे अत्यंत देखणे टफ बनवतो. ही त्याची कला, कुसर पाहता-पाहता अल्पावधीत तालुक्यासह जिल्हाभर नावलौकिकास पात्र झाली आहे.

आज या तरुणाकडे बेरोजगार युवकांचा आदर्श, प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाते. रामदास भाकरे, महादेव तांबारे, दत्ता कदम,चांगदेव गित्ते आदीसह संपादक डॉ. ऋषिकेश विघ्ने, प्रा.बिभिषण चाटे, अनिल गायकवाड आदींनी त्याच्या या गुणवत्तापुर्ण प्रेरणादायी व्यवसायाला शिक्षक दिनी शुभेच्छा दिल्या.

नानाने श्रमप्रतिष्ठा जोपासली !

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचे लहानपणापासूनच केलेले वाचन व त्यातून घेतलेल्या प्रेरणेनेतून ग्रामीण भागातून शहरापर्यंत उच्चशिक्षण घेऊन नानासाहेब डीडूळ यांनी पत्रकारितेतील ही उच्च पदवी प्राप्त केली; परंतु या व्यवसायातील अल्प मानधन,अस्थिरता आणि प्रामाणिक पणे काम करण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे नानाने थेट कुशन च्या व्यवसायात पदार्पन केले.तो आपल्या कष्ट व गुणवत्तेच्या जोरावर हजारो बेरोजगार युवकांचा प्रेरणास्थान ठरला आहे…’

–प्रा.बिभिषण चाटे
( सदस्य, महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद.)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.