अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शेतक-यांना तात्काळ पीक कर्ज आणि पीक विमा द्यावा अशी मागणी अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.
अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समिती ही संघटना प्रमुख मार्गदर्शक-सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर, कामगार नेते रमेश जाधव, सरचिटणीस राजेंद्र सदावर्ते,प्रमुख संघटक संदिप वाकोडे आणि समितीचे अध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जोपासत काम करते. संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना अप्पर जिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील सर्व बँकांकडून विनाअट पिक कर्ज तात्काळ द्यावे व मागील सन- 2018 सह उर्वरीत शेतक-यांचा पिक विमा तात्काळ मिळावा,आपल्या आदेशांना डावलून सर्व बँका पिककर्ज देण्यास जाणून बुजून कसल्याही अटी लादून पिक कर्ज टाळतात. त्यांचे खुप हाल होत आहेत.त्यांना सर्व बँकांकडून तात्काळ पिक कर्ज व त्यांचा उर्वरीत मंजूर झालेला पिक विमा द्यावा अन्यथा आमच्याकडून सर्व ताकदीनीशी आंदोलन केले जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील.असा इशारा अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.