परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी असलेले शिवशंकर गित्ते हे गेल्या २७ वर्षापासून देशासाठी सैन्य दलामध्ये सेवा देत आहेत. या सेवेत रुजू झाल्यापासून केलेल्या उत्कृष्ट सेवेबदल सैन्य दलाच्या वतीने सेवा गौरव पुरस्काराने दिल्लीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.
पांगरी येथील रहिवासी असलेले शिवशंकर गित्ते हे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर १९९३ मध्ये देश सेवेसाठी मिल्ट्री मध्ये भरती झाले. यानंतर देशाच्या सिमेवर जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, गुजरात आदी ठिकाणी नौकरी केली. नौकरी करत असताना वक्तृत्वाची आवड असल्याने सेवेअंतर्गत ज्याकाही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत होत्या यामध्ये सहभागी झाले. पुढे या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावल्याने कुठेही स्पर्धा असेल तर संधी मिळू लागली. जवळपास राष्ट्रीय पातळीवरील ६ ते ७ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मानवी अधिकार व सैनिक यासंदर्भात झालेल्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला. आमच्या वेगवेगळ्या कमांडच्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे मला आमच्या कमांडच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. यातून पुढे आपल्या राष्ट्राचा अभिमान, गौरव असलेले दिल्ली येथील २६ जानेवारीला होणाऱ्या सैन्याच्या परेडचे सूत्रसंचालन करण्याचीही संधी मिळाली. सैन्यात नौकरी करत असताना नौकरी बरोबरच इतर कार्यक्रमात सहभागी होता आले. यासर्व कामामुळे श्री.गित्ते यांना त्यांच्या २७ वर्षाच्या सेवेबदल दिल्ली येथे सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने पांगरी येथील रहिवाशी व मित्रमंडळीकडून अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.