अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथूजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हमीद अली यांच्या कार्याचा अंबाजोगाईत जागर करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन प्रवर्तनवादी कवी भारत सालपे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रनाना खेडगीकर हे होते.कोरोना साथजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने लागू असलेल्या सर्व सुचनांचे पालन करून हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हमीद अली यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना ज्येष्ठ कवी भारत सालपे म्हणाले की,”विद्यार्थी हा स्वाभिमानी असला पाहिजे.तो न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगणारा हवा” या कर्मवीरांच्या विचारांना सालपे यांनी यावेळी उजाळा दिला.प्रास्ताविक करताना प्रा.राम चौधरी यांनी पुरोगामी विचारांचे आणि सुधारणावादी दृष्टीचे सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रख्यात पक्षीमिञ डॉ.सलिम अली यांचे मोठे बंधू हमीद अली यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे यावेळी स्मरण केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रतिष्ठाणचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर म्हणाले की,”समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करताना हा गरीब हा श्रीमंत असा भेदभाव घामाच्या धाराबरोबर आपोआप गळून पडतो.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य केले.नव्या पिढीने कर्मवीरांच्या कार्याचा विसर पडू देऊ नये” असे आवाहन सुरेंद्रनाना खेडगीकर यांनी यावेळी केले.या प्रसंगी अरूण दैठणकर,वसंत दहिवाळ,गोविंद चाटे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठाणच्या वतीने प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी पुढाकार घेतला.